सुटीत गावी गेलेल्या मतदारांना पनवेलमध्ये आणण्यासाठी राजकीय पक्षांची शक्कल

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांतील घालमेल वाढली आहे. २४ मे म्हणजेच भर सुटीत मतदान होणार आहे. त्यामुळे आपापल्या मूळ गावी किंवा पर्यटनस्थळी मौजमजेसाठी गेलेल्यांची मते हातची जाणार, अशी भीती इच्छुकांना वाटू लागली आहे. या भीतीवर मात करण्यासाठी एक नामी शक्कल शोधण्यात आली आहे, ती म्हणजे मतदारांच्या गावीच गाडय़ा पाठवण्याची! मतदानापुरते पनवेलला या, नंतर पुन्हा नेऊन सोडतो, अशी विनवणी राजकीय नेते मतदारांना करत आहेत.

jp nadda
भाजपच्या निवडणूक तयारीला वेग; केंद्रीय मंत्र्यांचे क्लस्टर दौरे, संघटनात्मक नियोजनाचा आढावा
Central Election Commission disclosed the appointment of Pune District Collectors
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने केला ‘हा’ खुलासा
akola district, NCP, Ajit Pawar group, disputes, factionalism
अकोल्यात अजित पवार गटात धुसफूस सुरू, परस्परांवर कुरघोड्या
Suhas Babar
खानापूर-आटपाडीमध्ये सुहास बाबर निवडणुकीच्या रिंगणात ?

खारघर, नवीन पनवेल, कामोठे व कळंबोली या परिसरांत मोठय़ा प्रमाणात नोकरदार वर्ग आहे. सिडको वसाहतींत मोठय़ा प्रमाणात पुणे, सातारा, सांगलीतील नागरिक राहतात. २४ मे रोजी ते गावी असण्याची शक्यता जास्त आहे. त्यांची मते पदरात पाडून घेण्यासाठी इच्छुकांनी ‘गावी जा, पण मतदानासाठी गाडी पाठवतो, तिने पनवेलला या, मत द्या, जेवा आणि परत त्याच गाडीने गावी सोडतो,’ अशी विनवणी करण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील गाडय़ा बुक केल्यास त्याचा बोलबाला होईल, म्हणून त्या-त्या जिल्ह्य़ातील वा तालुक्यातील बस आणि पर्यटक वाहने भाडेतत्त्वावर घेण्याची योजना आखण्यात आली आहे.

निवडणूक सुटीच्या काळात घेऊ नये, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. कमी मतदान होण्याचे संकेत असूनही राज्य निवडणूक आयोगाने सुटय़ांच्या काळातच निवडणुका जाहीर करून भाजपची मागणी धुडकावून लावली. बहुतेक शाळा ७ जूननंतर सुरू होणार आहेत, त्यामुळे गावी गेलेले मतदार मे महिन्याच्या अखेरीस परत येतील, असे गृहीत धरत निवडणूक आयोगाने २४ मे ही तारीख निवडली.

पोटपुजेचीही सोय

परजिल्ह्य़ांतील मतदारांना मतदानासाठी आणल्यास त्याचा परिणाम मतांच्या टक्केवारीवर होईल, असे विविध राजकीय पक्षांच्या सल्लागारांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा खटाटोप केला जात आहे. प्रवासादरम्यानचे वाहन, प्रवासात दोन वेळचे जेवण व पुन्हा गावी त्याच गाडीने जाण्याची सोय अशा सर्व सुविधा देण्याचे नियोजन असल्याचे काही इच्छुक उमेदवारांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.