४ हजार मतदारांची नावे चुकीच्या प्रभागांत, उद्या आक्षेप नोंदवण्याचा शेवटचा दिवस

पनवेलमधील प्रारूप मतदार याद्यांवर हरकती नोंदवण्यास २७ मार्चपासून पुन्हा सुरुवात झाल्यानंतरही हरकतींचे सत्र सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांत सात सामूहिक हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. या सात हरकतींमध्ये सुमारे चार हजार मतदारांचे प्रभाग बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

बुधवारी दुसऱ्या दिवशी प्रभाग १७ मधून एक हजार दोनशे नव्या हरकती दाखल करण्यात आल्या. निवडणूक आयोगाने यापूर्वीच प्रत्येक मतदाराचे समाधान झाल्याशिवाय निवडणूक घेणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे हे हरकतसत्र सुरूच राहिल्यास निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. इच्छुक उमेदवारही आपल्या प्रचारासाठी संधी म्हणून हरकतींकडे पाहत असल्याचे दिसून येत आहे. ‘तुम्ही फक्त वास्तव्याचा आणि छायाचित्राचा पुरावा द्या, आम्ही तुमचे नाव तुमच्या प्रभागात आणतो,’ असे सांगून इच्छुकांचे कार्यकर्ते दुपारी घरोघरी जाऊन मतदारांची झोपमोड करीत आहेत. या कार्यकर्त्यांना ओळख विचारल्यास ते महापालिका प्रशासनाच्या नावे खडे फोडत आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्याची संधी साधत आहेत.

महापालिकेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर निवडणुकीची जबाबदारी त्यांना परिसराचा अभ्यास नाही. त्यामुळे हरकत नोंदवण्यासाठी आलेली व्यक्ती कोणत्या सेक्टरविषयी काय सांगते आहे, हेच समजण्यास कर्मचाऱ्यांना वेळ घालवावा लागत आहे.

यापूर्वी खारघरमधील ४ ते ६ या तीन प्रभागांमध्ये ७७ हजार पाचशे ३० मतदार होते. मात्र नव्याने जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये ८० हजार ३२४ मतदारांची नावे आली आहेत. त्यामुळे एका रात्रीत ऐवढे मतदार वाढले, कसे हा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाचे खारघर येथील पदाधिकारी संजय घरत यांनी केला आहे. प्रभाग ४ मध्ये यापूर्वीच्या प्रारूप मतदार यादीमध्ये ३३ हजार ६३५ मतदार होते याची संख्या वाढून आता ३६ हजार १८९ वर गेली आहे. तसेच प्रभाग ६ मध्ये यापूर्वी १६ हजार ३७५ मतदार होते. या प्रभागात नवीन यादीनुसार १५ हजार ४४३ मतदार आहेत.

भारतीय जनता पक्षाने यापूर्वी पालिका प्रशासनाला दोषी ठरवीत प्रभाग क्रमांक १७ मधील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक १८ मध्ये घालविल्याची हरकत घेतली होती. नवीन प्रारूप मतदार यादीमध्ये प्रभाग १७ मध्ये अजूनही सुमारे एक १२०० मतदारांची नावे प्रभागामध्ये नसल्याचा आक्षेप अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी घेतला आहे.

निवडणूक कार्यक्रमावरून शेकाप-भाजप वाद

मतदारयादीच्या दुरुस्तीनंतर निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम हाती घ्यावा, निवडणूक पुढे ढकलू नये, अशी भूमिका शेकापने घेतल्यामुळे भाजप विरुद्ध शेकाप आघाडी असा वाद रंगताना दिसत आहे. एकीकडे निवडणूक मे महिन्यात लागल्यास सुटय़ांमुळे गावी जाणाऱ्या नोकरदारांचा प्रश्न भाजपला सतावत आहे, तर पालिका निवडणुकीपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुका व शिक्षक मतदारसंघात मिळालेल्या यशामुळे शेकापला पोषक वातावरणाचा लाभ मे महिन्यात घ्यायचा आहे.