नव्या बससेवेच्या श्रेयावरून पनवेल पालिकेत धुसफुस
रिक्षावाल्यांच्या मनमानीला कंटाळलेल्या पनवेलकरांसाठी स्वप्नवत ठरावी अशी अंतर्गत बससेवा एनएमएमटीच्या माध्यमातून सुरू होणे ही खरे तर अत्यानंदाची बाब, मात्र या समाजोपयोगी उपक्रमातही श्रेयासाठीची लढाई, राजकीय कुरघोडीचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या, त्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून विविध सरकारी कार्यालयात खेटे मारणाऱ्या सिटीझन्स युनिटी फोरम अर्थात ‘कफ’ या संघटनेला या उपक्रमाचे श्रेय मिळत असल्याने पनवेल नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे पित्त खवळले. एवढे की शुक्रवारी झालेल्या या सेवेच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर ‘कफ’ला अनुल्लेखाने मारण्यात आले. एवढेच नाही, तर ज्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यामुळे ही सेवा प्रत्यक्षात आली, त्यांच्या महापौरांना रीतसर आमंत्रण देण्यासही पनवेल पालिका विसरली. यामुळे या कार्यक्रमासाठी पनवेलच्या दिशेने निघालेले नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे हे अध्र्या रस्त्यातूनच माघारी फिरले.
बससेवेच्या लोकार्पणाच्या या कार्यक्रमाचे आयोजन सुरुवातीला नवी मुंबई महानगरपालिका करणार होती. मात्र, महापालिकेने हा कार्यक्रम केल्यास बरेच राजशिष्टाचार पाळावे लागतील, त्यामुळे हा कार्यक्रम ‘कफ’च्या माध्यमातून झाल्यास त्या प्रकारच्या अडचणी येणार नाहीत, या विचाराने महापौर सोनावणे यांनी ‘कफ’च्या पदाधिकाऱ्यांना बोलावून कार्यक्रमाच्या यजमानपदासंबंधीचे पत्र दिले. हे पत्र घेऊन पनवेल नगरपालिकेत गेलेल्या ‘कफ’च्या मंडळींना भलत्याच अनुभवाला सामोरे जावे लागले. नगराध्यक्षा चारुशीला घरत यांच्या दालनात बसलेल्या एका ‘वजनदार’ नगरसेवकाने याबाबत महिलांच्या देखत अश्लाघ्य भाषेत नाराजी व्यक्त केली. नगराध्यक्षा घरत यांनीही या सेवेला पनवेल पालिकेने मंजुरी दिली असल्याने त्याच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन तुम्ही कसे करू शकता, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, ही सेवा सुरू व्हावी, यासाठी एनएमएमटीने आमच्याकडे प्रस्तावच पाठविला नसल्याने ती सुरू कशी होणार, असा आश्चर्यकारक पवित्रा घेतला. या सर्व घडामोडी घडत असताना लोकार्पणाचा हा कार्यक्रम अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला होता.
या उपक्रमाचे श्रेय ‘कफ’ला मिळत असल्याचे पाहून पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी गटनेत्यांची तातडीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत या सेवेचे भवितव्य ठरेल, असेही ‘कफ’ला सुनावण्यात आले. मात्र हे मनसुबे फोल ठरले. कात्रीत सापडलेल्या या मंडळींनी मदतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता, एनएमएमटीचा प्रस्ताव आला नसताना तुम्ही सर्वसाधारण सभेत या उपक्रमाचा ठराव मंजूरच कसा केलात, असा प्रश्न आमदारांनी त्यांना विचारला. एकदा मंजूर झालेला ठराव मागे घेण्याचा अधिकार गटनेत्यांना नसतो, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही सेवा सुरू व्हायलाच हवी, असा घरचा अहेरही आमदारांकडून त्यांना मिळाला. यानंतर पालिकेने ‘कफ’ला पत्र पाठवून या लोकार्पणाचे आयोजन पालिका करेल, असे कळवले. या कार्यक्रमासाठी ‘कफ’ने लावलेले प्रसिद्धी फलकही कार्यतत्पर पालिकेने हटवले व आपल्या नावाचे नवीन फलक झळकावले.

महापौरांचे आभार
या कार्यक्रमासाठी नवी मुंबईच्या महापौरांना आमंत्रण न मिळाल्याने ते माघारी फिरल्याचे आम्हाला समजले. ही बससेवा सुरू व्हावी, यासाठी नवी मुंबई महापालिकेने प्रथमपासून मोठे सहकार्य केल्याने आम्ही या कार्यक्रमानंतर त्यांचे कार्यालय गाठले व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले, अशी माहिती ‘कफ’चे मनोहर लिमये यांनी दिली.