मोदींच्या छायाचित्रासमोर वाहन उभे करणाऱ्यांना दमदाटी

खारघर येथील ओवे गावाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेल्या फलकासमोर लावलेले उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्राचा फलक असलेले वाहन हटवण्यासाठी दमदाटी करण्यात आल्याची तक्रार शिवसेनेने खारघर पोलीस ठाण्यात केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.

खारघरमध्ये शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्राचा फलक असलेली गाडी (मोबाइल होर्डिग व्हॅन) एका चौकात उभी करण्यात आली होती. या गाडीमुळे नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेला फलक झाकला जात होता, त्यामुळे गाडीच्या चालकाला दमदाटी करून तेथून जाण्यास सांगण्यात आले. या प्रकरणी शिवसेनेचे उमेदवार मंगेश रानवडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी १५ दिवसांपूर्वी पनवेल पालिकेची निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडली जाईल, असे आश्वासन दिले होते, मात्र पनवेलमधील चित्र उलट असल्याचे दिसत आहे.

आणखीही काही वादविवाद

  • पनवेल महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून विविध राजकीय वाद चर्चेत आले आहेत. या निवडणुकीत वादांची सुरुवात भाजपचे उमेदवार संतोष शेट्टी यांनी केली. या परिसरात दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे शेट्टी यांची दादागिरी चर्चेत आली.
  • दोन दिवसांपूर्वी कामोठे येथे शेकापचे उमेदवार सचिन गायकवाड यांच्या वाहनावर भाजपचे उमेदवार जगदीश गायकवाड यांनी हल्ला केल्याची तक्रार सचिन यांनी नोंदविली. पोलीस घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासत आहेत; परंतु अद्याप हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही.