दिघ्यातील पालिका नागरी आरोग्य केंद्र, पालिकेची प्राथमिक शाळा क्रमांक ५१ आणि ५२ तसेच माध्यमिक शाळा क्रमांक १०८ आणि हिंदमाता विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय आहे. या शाळा व महाविद्यालयांसाठी एमआयडीसीच्या जागेवर एकच मैदान आहे; परंतु सध्या त्यावर बेकायदा इमारतींतील रहिवाशांनी वाहने पार्किंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करीत वर्ग गाठावा लागत आहे, तसेच आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना उपचारांसाठी अडथळे पार करावे लागत आहेत.

पालिका आणि हिंदमाता विद्यालय ही खासगी शाळा आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी दिघ्यातील मध्यवर्ती भागात एकच मैदान आहे. त्यावर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे आता खेळायचे कुठे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

काही भूमाफियांनी जागा बळकावून बेकायदा इमारती उभारल्या आहेत. इमारतीमध्ये पार्किंगसाठी जागा शिल्लक नसल्याने रहिवासी या मैदानात वाहने पार्क करीत आहेत. काही फेरीवाल्यांनीही येथील जागा बळकावली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करताना तसेच बाहेर जाताना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या मैदानाच्या बाजूला लागूनच नवी मुंबई महानगरपालिकेचे नागरी आरोग्य केंद्र आहे. नागरी आरोग्य केंद्रात जाण्यासाठी आलेल्या रुग्णांनाही उभ्या केलेल्या वाहनांचा त्रास होत आहे.