लहान मुलांना इडली व वडापावचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या मुत्थी नाडर या व्यक्तीला पोलिसांनी गुरुवारी रात्री कळंबोलीतून अटक केली. या प्रकरणातील पीडित मुली गरीब कुटुंबातील असल्याने या अत्याचाराला वाचा फुटली नाही. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कळंबोली पोलिसांच्या मदतीने या अत्याचारी अण्णाला त्याच्या घरातून अटक केली. या पीडित मुली सातवी व आठवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या आहेत. आणखी दोन मुलींवर अत्याचार झाल्याचे समजते. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला.
कळंबोली येथील हनुमान मंदिराच्या मागे व्यवसाय करणाऱ्या मुत्थी नाडर याने ही अत्याचारी कृत्ये केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. ज्या ठिकाणी मुत्थी व्यवसाय करतो त्या परिसरात मोठय़ा प्रमाणात माथाडी कामगार राहतात. माथाडी कामगारांसोबत येथे घरकाम करणाऱ्या गरीब महिलांची कुटुंबेही राहतात. अशा गरिबांच्या लहान मुलींवर त्याने केलेल्या अत्याचाराचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांचे वेगळेवेगळे पथक या प्रकरणात तपास करीत आहेत. कळंबोली पोलीस ठाण्यात मुत्थी नाडर विरोधात बालक लैंगिक सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुत्थी हा एलआयजीमधील सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीमधील ए चाळीत कुटुंबासोबत राहतो. त्याला पत्नी व अकरा वर्षांचा मुलगा आहे. तेथेच त्याचे दुकान होते. मागील आठ वर्षांपासून तो येथे व्यवसाय करत आहे. मूळचा तामिळनाडूचा असल्याने त्याने कळंबोलीमधील नाडर सामाजिक संघटनेचे सदस्यत्व घेतले. याच संघटनेच्या काही पुढाऱ्यांचा त्याला पाठिंबा आहे.