रात्री दोननंतर सोसायटीच्या सुरक्षारक्षक चौकीत डुलकी घेणाऱ्या सुरक्षारक्षकांवर नजर ठेवण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याने पोलीस आता सोसायटीच्या प्रवेशद्वारावर कर्तव्यासाठी असलेल्या सुरक्षारक्षकांवर पाळत ठेवणार आहेत. दोन सत्रात काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वाराच्या जवळच खडा पहारा देण्याच्या सूचना वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचा परीक्षा काळ संपत येत असल्याने अनेक कुटुंबे गावी जात असल्याने पोलिसांनी ही सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे.
नवी मुंबई पोलिसांनी सोनसाखळी चोरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही केलेल्या उपाययोजना कामी आल्या असून सोनसाखळी चोरीच्या घटनांत घट झाली आहे. याच धर्तीवर घरफोडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी सोसायटी व असोशिएशनच्या सुरक्षारक्षकांना वठणीवर आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. रात्री बारा-एक वाजे पर्यंत इमानेइतबारे नोकरी करून सोसायटीतील सर्व सदस्य आल्यानंतर सोसायटीच्या प्रवेशद्वारांना टाळे ठोकून झोपा काढणारे अनेक सुरक्षारक्षक आहेत. सोसायटींना सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या एजन्सीनी शक्यतो वयोवृद्ध, उत्तर भारतीय सुरक्षारक्षकांचा भरणा केलेला आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. केवळ सोसायटीकडून बिले वसूल करून त्यातील काही पैशावर डल्ला मारण्याचे काम या एजन्सी करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बहुतांशी सोसायटीतील सुरक्षारक्षक रात्री दोननंतर डुलक्या घेत असल्याचे दिसून येते. नवी मुंबई पोलिसांनी या सुरक्षारक्षकांना जागे करण्याची मोहीम मध्यंतरी हाती घेतली होती. त्यासाठी झोपा काढणाऱ्या सुरक्षारक्षकांवर पाणी टाकून त्यांना जागे केले जात होते. यात काही पोलीस कर्मचारी सुरक्षारक्षकांना मारहाण करून अतिरेक करीत असल्याचे दिसून आले आहे. वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक लांडगे यांनी सर्व सोसायटींना सूचना दिल्या असून, सुरक्षारक्षक हा प्रथमदर्शनी सकाळपर्यंत सजगपणे तैनात असावा, त्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वीच पोलिसांनी सर्व सोसायटींनी सीसी टीव्ही लावण्याच्या सूचना केलेल्या आहेत, मात्र अनेक सोसायटींनी त्या पाळलेल्या नाहीत. त्यामुळे सुट्टय़ांचा काळ सुरू होत असल्याने निदान सुरक्षारक्षकांनी सर्तक राहण्यास पोलिसांनी सांगितले आहे.