कळंबोलीमध्ये आज बैठक

पनवेल व उरण तालुक्यामधून चोरीला गेलेल्या वाहनांची किंमत कोटय़वधी रुपयांच्या घरात गेल्याने या वाहनचोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी वाहनमालकांचे प्रबोधन करण्याचे ठरवले आहे. यासाठी कळंबोली येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी दहा वाजता बैठक आयोजित केली आहे.

वाहनचोरी रोखण्यासाठी वाहतूकदारांनी स्वत:च्या आस्थापनांमध्ये चालक व क्लीनर यांचे पोलीस आयुक्तालयातून त्यांची चारित्र्य-पडताळणी करूनच कामावर ठेवणे, अवजड वाहनांमध्ये जीपीआरएस प्रणाली लावणे, याबरोबरच वाहनतळांच्या नावावर रोडपाली, कळंबोली पोलादबाजारात सुरू असलेल्या बेकायदा वसुलीबाबत बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. अवैध वाहनतळाकडून मोजावे लागणारे  महिना दोन ते तीन हजार रुपयांबाबत  पोलीस व इतर प्रशासनातील अधिकाऱ्यांना वाहनमालकांना उत्तरे द्यावी लागणार आहेत.

अधिसूचना काढूनही कळंबोली येथील पोलाद बाजारामधील खिडूक पाडा ते बिमा कॉम्प्लेक्स या मार्गावर अवजड वाहने उभी करून वाहतूक कोंडी केली जाते.  हा सर्व कोंडीचा खेळखंडोबा वाहतूक विभागाच्या डोळ्यांसमोर वर्षांनुवर्षे  सुरू आहे,त्या प्रश्नावरून या बैठकीत गदारोळ होण्याची शक्यता आहे. बैठकीमध्ये पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी, पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला, वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त अरविंद साळवे, सिडकोचे अधीक्षक अभियंता किरण फणसे, वाहतूक विभागाचे विजयकुमार, कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते तसेच रस्ता सुरक्षेसाठी काम करणाऱ्या काही सामाजिक संस्थांचे तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.