पायाभूत सुविधांकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पनवेल पालिका निवडणुकीमध्ये विकसनशील पनवेलसाठी मतदारांना अनेक आश्वासने दिली. मात्र या निवडणुकीत स्वत:चा किंवा राजकीय पक्षाचा प्रचार करणाऱ्या या नेत्यांनी सामान्य मतदारांच्या दैनंदिन समस्यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मग तो सिडको वसाहतींमधील तीन आसनी रिक्षाचालकांची भाडे आकारणीबाबतची मनमानी असो किंवा आठवडय़ातील तीनच दिवस होणारा पाणीपुरवठा असो, यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांना राजकीय पक्षांच्या वचननामा, जाहीरनामा किंवा विकासनाम्यात स्थान नसल्याचेच प्रकर्षांने दिसून आले आहे.

कामोठे वसाहतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला पनवेलकरांनी चांगला प्रतिसादही दिला. याच सभेत ठाकरे यांनी ज्येष्ठ शिवसैनिकाच्या हस्ते ‘करून दाखवणारच’ असा वचननामा प्रसिद्ध करताना ‘मी पनवेल जिंकायला आलोय’, अशी घोषणाही केली. पण या वसाहतींमध्ये शिरताना उद्धव ठाकरेंना कामोठेच्या मुख्य प्रवेशद्वारावरून थेट पनवेल-शीव महामार्ग गाठताना कराव्या लागलेल्या वाहतूक कोंडीबाबत मात्र कोणत्याही उपाययोजनेचा उल्लेख या वचननाम्यांमध्ये नसल्याचे दिसून आले. याशिवाय या वसाहतींमधील दूध, भाजीवर लागणारा स्थानिक दादागिरीचा कर, उन्हाळ्यापूर्वी आणि ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेली पाणीटंचाई, कोटय़वधी रुपये खर्च करून उभारलेल्या रस्त्यांवरील खड्डय़ांचे साम्राज्य, यासाठी जबाबदार कंत्राटदारांवरील कारवाईची आश्वासने याच्या पूर्ततेबाबत मात्र कोणत्याही राजकीय पक्षांनी आपली भूूमिका मतदारांपुढे मांडलेली नाही. याशिवाय पालिकेत समाविष्ट केलेल्या २९ गावांमधील पालिकेच्या शाळा, दर्जेदार शिक्षण, प्रयोगशाळा, वाचनालय, अभ्यासिका या मुद्दय़ांवर देखील या पक्षांनी दुर्लक्षच केल्याचे दिसून आले. त्याचबरोबर माथाडी कामगारांची पक्की घरे नियमित करण्यासाठीचे धोरण, सिडको प्रशासनाने खांदेश्वर, कळंबोली, कामोठे, खारघर येथील सेवा रस्ता, कळंबोली ते कामोठे रस्त्याची दयनीय अवस्था, खारघर ते कळंबोली महामार्गावरील उड्डाणपुलांखालचे भुयारी मार्ग याविषयीची ठोस भूमिका मांडण्यात या राजकीय पक्षांना कोणतेही स्वारस्य नसल्याचेच या निवडणुकीच्या प्रचारात प्रकर्षांने दिसून आले.