पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतर हवा पूर्ववत होण्याची शक्यता

सह्य़ाद्री पर्वतरांगांमधील डोंगरांचा एक भाग आणि समुद्र यांच्या मधोमध असलेल्या नवी मुंबईत गेले दोन दिवस प्रदूषणाचा एक पट्टा तयार झाला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेच्या पट्टय़ातील थर्मल इनव्‍‌र्हशनमुळे हा पट्टा मुंबई, ठाण्याच्या तुलनेत जास्त आढळून येत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे. या प्रदूषणामुळे सर्वत्र धुके पसरल्याचा भास होत असून वातावरणात आद्र्रता वाढली आहे. यामुळे ताप, डोकेदुखी, कणकण अशा आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. थंड आणि गरम हवेचे समप्रमाण समीकरण जुळून आल्यानंतर हा प्रदूषणाचा पट्टा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबईची निर्मितीच मुळात खाडीजवळील पाणथळीच्या जागांवर भराव टाकून करण्यात आली आहे. भौगोलिकदृष्टय़ा एका रांगेत असलेले हे शहर खाडी व पारसिक डोंगररांगेच्या मधील १०८ चौरस किलोमीटर परिसरात वसले आहे. त्यामुळे हवेची पोकळी या भागात आजूबाजूच्या इतर शहरांच्या तुलनेत जास्त निर्माण होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे उन्हाळ्यात येथील तापमानही काहीसे चढे असल्याचे आढळले आहे. पाऊस आता परतीच्या मार्गावर असल्याने सकाळी उष्णता आणि रात्री गारवा असतो. त्यात पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे.

उत्तर भारतात निर्माण होणाऱ्या थंड पट्टय़ाचा परिणाम सर्वत्र जाणवत असून समुद्र आणि डोंगर यांच्यामधील नवी मुंबईवर तो तुलनेने जास्त असल्याचे दिसते.

या वातावरणाचा फायदा टीटीसी औद्योगिक पट्टय़ातील काही छोटे कारखाने घेत आहेत आणि हवेत कंपनीतील प्रदूषणयुक्त हवा सोडत आहेत, असे दिसते.

थर्मल इन्व्हर्शन म्हणजे..

साधारणपणे गरम हवा वर जाते तर थंड हवा खाली पसरते, मात्र गेले दोन दिवस थंड हवा उंच जात असून गरम हवा खाली राहत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे धुके पसरल्याचा भास होत आहे. याला ‘थर्मल इन्व्हर्शन’ म्हटले जाते.

मुंबई, ठाण्यापेक्षा नवी मुंबईची भौगोलिक रचना वेगळी आहे. त्यामुळे वातावरणातील फरक नवी मुंबईत इतर शहरांच्या तुलेनेत तीव्रतेने जावणतो. नवी मुंबईचाच भाग असलेल्या खारघरमध्ये हा पट्टा दिसून येणार नाही. सध्या वातावरणात थर्मल इनव्हर्शनचा पट्टा निर्माण झाला असून त्याचा प्रभाव नवी मुंबईवर जास्त आहे. त्यामुळे संध्याकाळी किंवा रात्री नवी मुंबईत धुके आणि प्रदूषण जाणवते. परतीचा पाऊस पूर्णत: बंद झाल्यानंतर ही पातळी कमी होण्याची शक्यता आहे.

जी. एस. गिल, पर्यावरण सल्लागार टेरी