उद्योजक- संजय मेहता

वैद्यकीय, संरक्षण, अवकाश, माहिती तंत्रज्ञान आणि ऑॅटोमोबाइल क्षेत्रात लागणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा इलेक्ट्रॉनिक्स साहित्यांची निर्मिती करण्याचा दांडगा अनुभव महापे येथील पोटरेलॅब कंपनीला आहे. मागील वीस वर्षांत या कंपनीने देश-परदेशीतील शेकडो कंपनींसाठी असे इलेक्ट्रॉनिक्स प्रिंटेट साहित्य दीड लाखांपर्यंत तयार केली असून यात युनिक आयडी कार्डपासून ते पॅनकार्डपर्यंतच्या सर्व साहित्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही कंपनी सध्या एका आगळ्यावेगळ्या वैद्यकीय साहित्याची निर्मिती करण्यात गुतंली आहे. स्ट्रेस टेस्ट घेताना रुग्णांच्या छातीवर अनेक वायरचे जाळे लावले जाते. या वायर न लावताही ही टेस्ट करता येईल असे साहित्यनिर्मितीचा ध्यास या कंपनीने घेतल्याचे संचालक संजय मेहता सांगत होते. त्यासाठी युरोपमधील एका वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे साहाय्य घेतले जात आहे. बीकॉम करून सीए केल्यानंतर अहमदाबादच्या आएएममधून एमबीए केलेल्या मेहता यांनी उद्योजक होण्यासाठी एक वेगळा मार्ग चोखाळला आणि त्यात आज यशस्वी भरारी घेतली आहे. आवडीने कोणत्याही क्षेत्रात काम केल्यास यश नक्कीच मिळते असे मेहता सांगतात.

साडी प्रिंटिंग व्यवसायात असलेल्या वडिलांनी त्या वेळी धंद्यात काही राम राहिला नाही असे संजय मेहता यांना सांगितले होते. त्यामुळे सीए-एमबीए असे नोकरीसाठी लागणारे शिक्षण घेतल्यानंतरही मेहता यांच्यामधील इलेक्ट्रॉनिक्स तळमळ काही स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर एका काकांच्या कारखान्यात उमेदवारी सुरू झाली. अंधेरीला सुरू झालेला हा व्यवसाय नंतर वरळीमध्ये पसरला. मुंबईतील गाळ्यांचे भाडे व्यवसायासाठी परवडत नसल्याने मेहता यांनी १९९६ मध्ये नवी मुंबई गाठली. इलेक्ट्रॉनिक्स साहित्य तयार करण्यामध्ये तोपर्यंत पोटरेलॅबने आपला वेगळा ठसा उमटविला होता. महापे येथील इलेक्ट्रॉनिक्स झोनमध्ये आज तीस हजार चौरस फूट क्षेत्रात हे साहित्यनिर्मितीचे काम सुरू असून अमेरिका, जर्मनी, युरोप, लंडन आणि थायलंड या देशांना हे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य पुरविले जात आहे. गेल्या वीस वर्षांत ९०० प्रकारच्या दीड लाख इलेक्ट्रॉनिक्स साहित्य निर्माण करण्यात पोटरेलॅबला यश आले आहे. सध्या वैद्यकीय क्षेत्रात बायपास करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी अनेक स्ट्रेस टेस्ट घेतल्या जातात. ईसीजी केले जाते. या वेळी रुग्णाला अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स जोडण्या लावून तपासणी केली जाते. युरोपमधील एका कंपनीच्या साह्य़ाने पोटरेलॅब रिमोट कंट्रोलवर या टेस्ट घेण्याची यंत्रणा विकसित करीत आहे. त्यासाठी शरीराला इलेक्ट्रॉनिक्स वायर लावण्याची आवश्यकता पडणार नाही. थ्रीडी टच स्क्रीनवर शरीरातील स्पंदने टिपली जाणार आहेत. त्यामुळे रुग्णांना होणारा बराचसा त्रास कमी होणार आहे. डिजिटाईजेशनचा सध्या जमाना सुरू झाला आहे, मात्र डिजिटाईजेशनसाठी लागाणाऱ्या साहित्याची निर्मिती पोटोलॅबने २००३ मध्येच सुरू केली होती. त्यासाठी आधार कार्डवर लागलेले युनिक आयडी कोड, पॅन कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या कंपनीच्या द्वारे बनविली गेली आहे. संगणकांचे की बोर्ड तर अनेक वर्षे पोटरेलॅब देश-विदेशात वितरित करीत आहे. केवळ इलेक्ट्रॉनिक्स साहित्यनिर्मितीपर्यंत न थांबणाऱ्या पोटरेलॅबने हिरे पॅकेजिंगचे कसब विकसित केले असून स्विस हिऱ्यासाठी लागणारे वेष्ठण या कंपनीद्वारे तयार केले जात आहे. समस्या ही एक संधी असून संघर्षांशिवाय आयुष्यात काहीही नाही असे व्यवसायाने सीए पण एक यशस्वी उद्योजक ठरलेल्या मेहता यांचा उद्योग मंत्र आहे.