शीव- पनवेल महामार्गावर मोठय़ा प्रमाणात पडलेल्या खड्डयामुळे दोन दुचाकीस्वरांचा बळी घेतल्यानंतरही या मार्गावरील खड्डे जैसे थे आहेत. त्यामुळे सर्व उड्डाणपूलांवर वाहतुक कोंडी होत आहे.
शीव- पनवेल महामार्ग पुनर्बाधणी करणाऱ्या टोलवेज कंपनीने खड्डे बुजवण्यात असमर्थता दाखविल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ही खड्डे बुजविण्याचे काम दुसऱ्या कंत्राटदाराला दिले आहे.
या खडय़ावर होणारा खर्च सायन पनवेल टोलवेज कंपनीकडून वसुल केला जाणार आहे. काही खड्डे बुजवल्यानंतरही त्यातील पेव्हर ब्लॉक पुन्हा बाहेर आल्यामुळे हा रस्ता वाहतुक कोंडीचा महामार्ग झाला आहे,
सायन पनवेल महामार्गावर मागील महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे एका खासगी सव्‍‌र्हेक्षणानुसार अडीच हजार खड्डे पडल्याची नोंद आहे तर सायन पनवेल रोडवेज कंपनीने बारा हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर खड्डे पडल्याची कबुली दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला नवी मुंबई मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली खड्डे बुजविण्याचा इशारा दिला होता. हे खड्डे लवकरात लवकर न बुजविल्यास अधिकाऱ्यांच्या खूच्र्या पळविण्यात येतील असे कळविण्यात आले होते. त्यानंतर सांबाने हे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी मोठे खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर केला गेला होता.
शिरवणे उड्डाण पूलावरील पेव्हर ब्लॉक पुन्हा वर आल्याने तेथे वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. हीच स्थिती तुर्भे, सिबिडी, नेरुळ या उड्डाणपुलावरही निर्माण झाली आहे.
दोन दिवसापूर्वी ह्य़ाच मार्गावरुन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवास केला होता पण त्यांनी ह्य़ा खड्डयाची दखल न घेतल्याने काळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सायन पनवेल महामार्गावर या खड्डयामुळे दोन बळी गेल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग गांभीर्याने दखल घेत नसल्याचे दिसून येते. १२०० कोटी रुपये खर्च करूनही या मार्गावर इतक्या मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्याने आश्र्चय व्यक्त केले जात आहे.