गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांची वाट बिकट
गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची महामार्गावरील खड्डय़ांमुळे वाट बिकट झाली आहे. खड्डय़ांचे विघ्न दूर करण्यसाठी दोन दिवसांपूर्वी राज्याच्या दोन मंत्र्यांनी पनवेल ते इंदापूर या पल्ल्यावरील खड्डे पाहणीचा दौरा करून ही वाट निर्विघ्न करा, असे तोंडी आदेश दिल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वेगळे कंत्राटदार तात्पुरते खड्डे भरण्याचे काम करीत आहेत; मात्र घाईच्या दुरुस्तीनेही कारणामुळे कोकणवासीयांची वाट बिकट झाली आहे. पळस्पे ते वडखळ हा खड्डे मार्ग बनल्याने या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील पनवेल ते इंदापूर हा ८४ किलोमीटरच्या पल्ल्यावरील १४ किलोमीटरच्या अंतर हे खड्डेमय रस्त्याचे असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यापैकी १० किलोमीटरवरील खड्डे दूर केल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केला आहे. उर्वरित ४ किलोमीटरवरील खड्डे भरण्याचे व काही ठिकाणी डांबरीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तीन दिवसांच्या सततच्या पावसामुळे या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू राहिले. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणातील वाट कशी सुखकर करावी, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या दोन मंत्र्यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर ३ तारखेपर्यंत या महामार्गावरील सर्व खड्डे भरून काढावे असा आदेश दिल्यामुळे येथे जोरदार कामे सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात पळस्पे ते वडखळ या रस्त्याची आजही बिकट अवस्था आहे. महामार्ग प्राधिकरणाने या मार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या ‘सुप्रीम’ कंपनीला हे खड्डे भरण्याचे व दुरुस्तीचे काम करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सहा वेगवेगळी पथके पनवेल ते इंदापूर या पल्ल्यावर सुमारे दोनशे मजूर व अद्ययावत यंत्रणेसोबत काम करत असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक प्रशांत फेडगे यांनी दिली. काही ठिकाणी डांबरी रस्ते व पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे भरले जात आहेत. मात्र त्यामध्येही मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

गणेशोत्सवात अवजड वाहनांची वाहतूक बंद
१ सप्टेंबरपासून ५ सप्टेंबपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन वजनापेक्षा वजन असलेल्या वाहनांना बंदी आहे. ६ सप्टेंबरपासून १४ सप्टेंबपर्यंत या महामार्गावर सर्वच जड-अवजड वाहनांना बंदी आहे. १ ते १६ सप्टेंबपर्यंत रेती व वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंदी राहील. बंदीचे हे निर्देश जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या वाहनांना लागू नसतील.