ठाणे-बेलापूर मार्गात जागोजागी खड्डे; अपघाताच्या भीतीने वाहनचालकांचा जीव मुठीत

ठाणे-बेलापूर मार्गाच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी जवळपास दीड कोटी खर्च केले जात असतानाही पावसाळ्यात या रस्त्याची अक्षरश: चाळण होत आहे. विशेष म्हणजे, यंदा खड्डे भरण्यासाठी टाकलेली खडी पावसाच्या माऱ्याने रस्त्यावर सर्वत्र पसरू लागली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहेच, त्याबरोबरच अपघातांची भीतीही बळावली आहे.

ठाणे आणि नवी मुंबईला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असला तरी नवी मुंबई महापालिकेने दुरुस्तीसाठी कमालीची उदासीनता दाखवली आहे. दिघा ते उरण फाटा या १८ किलोमीटर टप्प्यात हा मार्ग पावसाच्या माऱ्याने जागोजागी खचला आहे. या मार्गावरील एका मोठय़ा खड्डय़ाने दोन आठवडय़ांपूर्वी एकाचा बळी घेतला आहे. ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तरीही सुरळीत वाहतुकीची जबाबदारी पार असताना त्यांची मोठी कवायत होत आहे. पावसाने झोडपून काढल्यानंतर अवघ्या दहाच दिवसांत हा मार्ग खड्डय़ांनी  भरून गेला आहे. त्यावर काही तरी उपाय म्हणून टाकलेला खडी-मातीचा भराव पावसाने वाहून गेला आहे. त्यानंतर नवी मुंबई  महानगरपालिकेने या मार्गाच्या स्थितीकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

  • ठाणे बेलापूर मार्गावरून मुंबई, आणि ठाण्याहून पनवेलकडे रोज एक लाखांहून अधिक वाहनांची ये-जा
  • काही वर्षांपूर्वी मार्गाच्या रस्त्यांचे रुंदीकरण. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काहीअंशी संपुष्टात
  • अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद, गतिरोधकांची कमतरता.

खड्डेच खड्डे

दिघानगरजवळील रामनगर, रबाळे पोलीस ठाणे, घणसोली नाका, नोसिल नाका, महापे उड्डाणपूल, तुभ्रे स्टोअर ते तुभ्रे नाका, सायन पनवेल मार्गावरील सानपाडा वाशी पुलाखालील परिसर, शिरवणे गाव आणि उरण फाटा खासगी कंपन्यांचे सुरक्षा रक्षक खासगी कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकारी ते कर्मचाऱ्यांच्या कार कंपन्यांच्या प्रवेशद्वारातून आत मार्गस्थ करण्यासाठी कंपन्यांचेच खासगी सुरक्षा रक्षक ठाणे-बेलापूर मार्गावर ‘वाहतूक व्यवस्था’ सांभाळतात. साहेबाची गाडी निर्धोक कशी जाईल यासाठी ते मार्गावरील इतर वाहनांना थांबवतात. मगच मार्गावरील मुख्य वाहतूक सुरू केली जात असते. या वेळी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती असते. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी अधिकच उग्र रुप धारण करते.

भुयारी मार्गाकडे कानाडोळा

सायन पनवेल मार्गावरील शिरवणे येथे वर्षभरापुर्वी उड्डाणपुल उभारला आहे. या उड्डाणपुलाच्या खालुन शिरवणे गावाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग ठेवण्यात आला आहे. मात्र पुलाचे काम करत असताना या भुयारी मार्गाच्या सोयीसुविधाकडे लक्ष दिले जात नाही. याठिकाणी अंधाराचे साम्राज्य असून हा भुयारी मार्ग मद्यपींचा अड्डा बनला आहे.

अपघातप्रवण क्षेत्र

  • दिघा, महापे आणि तुर्भे या ठिकाणी वर्षभरात अपघातात सात जणांचा बळी
  • किरकोळ अपघाताच्या पोलीस ठाण्यात रोजच नोंदी ठाणे-बेलापूर मार्गावर खड्डे पडले आहेत, ही सत्य बाब आहे, ज्या ठिकाणी खड्डे पडले आहे ते बुजवले जातील.

अंकुश चव्हाण, नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्तआयुक्त

शिरवणे पुलाखालून नेरुळकडे येण्यासाठी विशेषत गावठाणातील नागरिकांसाठी रस्ता ठेवण्यात आला आहे. मात्र ठाणे-बेलापूर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी यांचा नाहक त्रास सोसून नेरुळकरांना ये-जा करावी लागत आहे.

प्रशांत म्हात्रे, रहिवासी नेरुळ

ठाणे-बेलापूर मार्गावर रबाळे नाका आणि महापे, तुभ्रे नाका येथील रस्त्यांची दरवर्षी होणारी अवस्था पाहता मुंबईतून येणाऱ्या नागरिकांकडून टोल घेऊनही चांगला रस्ता उपलब्ध करून दिला जात नाही. अपघात झाल्यास साधी रुग्णवाहिकाही नाही.

-अजिंक्य केणी, नागरिक