नवी मुंबई महापालिका, सायन-पनवेल टोलवेजच्या हद्दवादात प्रवाशांचे हाल

तुर्भे येथील उड्डाणपुलाखाली पडलेल्या भल्या मोठय़ा खड्डय़ात रोज अनेक वाहने आदळत आहेत. नवी मुंबई पालिका आणि सायन-पनवेल टोलवेजच्या हद्दवादामुळे या खड्डय़ाला वालीच उरलेला नाही. त्यामुळे प्रवाशांचे मात्र कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील १८ किलोमीटरच्या पट्टय़ाची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेकडे आहे. हे अंतर तुर्भे उड्डाणपुलाखाली संपते. शीव-पनवेल मार्गाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल टोलवेज कंपनीवर सोपवली आहे. पालिका आणि कंपनीच्या हद्दवादात तुर्भे येथील एस. के. व्हिल्सपासून पुढे तुर्भे पोलीस ठाण्यापर्यंतच्या ५०० मीटरच्या रस्त्याला कोणी वालीच उरलेला नाही.

या मार्गावर अनेक मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रोजच वाहतूककोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी अनेक वेळा पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे, मात्र अद्याप रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही.

तुर्भे पुलाखाली पनवेल दिशेकडून येणाऱ्या भागात सुरुवातीला आणि ठाणे-बेलापूर मार्गावर हुंडाई गाडय़ांच्या शोरूमसमोरील ५०० मीटरच्या मार्गाची दुरवस्था झाली आहे.  विशेष म्हणज ठाण्याकडे जाणाऱ्या एनएमएमटीच्या बस थांब्याजवळ एक अडीच फूट खोल खड्डा पडला आहे. या खड्डय़ात गाडी गेली की ती बाहेर येण्यास वेळ लागतो. त्यामुळे याच मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. याचा फटका दोन्ही बाजूंच्या गाडय़ांना बसतो. मुंबईकडे येणाऱ्या व गोव्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.