मुदत संपण्यास अवघे २ दिवस शिल्लक

यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असल्याने २५ मे पूर्वी शहरातील सर्व मान्सूनपूर्व कामे झाली पाहिजेत अशी तंबी नवी मुंबई पालिका आयुक्त रामास्वामी यांनी देऊनही मुदत संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना मान्सूनपूर्व कामे संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. नेरुळ व बेलापूर येथे घरगुती गॅस वाहिनीसाठी खोदण्यात आलेले खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. अनेक मुख्य गटारे व पावसाळी नाल्यांतील गाळ काढण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे कामे करण्याचे आदेश देऊन आयुक्त परदेशात गेल्याने त्यांच्या पाठोपाठ काही अधिकाऱ्यांनीही परदेशवारी सुरू केली आहे.

वेधशाळेने यंदा पाऊस लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तेव्हापासून स्थानिक प्राधिकरणांची मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी तारांबळ उडाली आहे. नवी मुंबई पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनाही अभियंता, प्रशासन, आरोग्य विभागांची सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांसाठी २५ मे ही अखेरची मुदत दिली होती. ही मुदत संपण्यास अवघे दोन दिवस राहिलेले असताना शहरातील मान्सूनपूर्व कामे संथगतीने सुरू असल्याचे दिसून येते. यात मान्सून कोणत्याही क्षणी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असताना रस्त्यावरील खड्डे, नाले, गटारे स्वच्छ करण्याची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. खडी आणि वाळू उत्खननाला बंदी असल्याने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास विलंब होत असल्याचे समजते.

पालिकेच्या अभियंता विभागाने पनवेल व उरण भागांतून खडी वाळू आणून रस्ते बांधणीची कामे केली जात आहेत, मात्र या कामालाही काही मर्यादा आलेल्या आहेत. नेरुळ व बेलापूर येथे महानगरची गॅसवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चर खोदून ठेवण्यात आलेले आहेत. या महिन्यात ही कामे न केल्यास ग्राहकांना डिसेंबपर्यंत गॅस वहिनीची वाट पाहावी लागेल. त्यामुळे पालिकेने येथे खोदकामाला मान्यता दिल्याचे एका अभियंत्याने सांगितले.

आयुक्त, अधिकाऱ्यांचा परदेश दौरा

२५ मेची मुदत दिल्यानंतर पालिका आयुक्त युरोपला गेले होते. याच काळात शहर अभियंता मोहन डगावकर व उपायुक्त अमरीश पटनिगिरे ही कुटुंबासोबत बाहेरगावी गेले आहेत. मान्सूनपूर्व कामांची तयारी करणारे प्रमुख अधिकारीच शहरात नसल्याने आपत्ती व्यवस्थापन, नाले साफसफाईसारखी कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.