स्वच्छता, फेरीवाले, वाहतुकीचा प्रश्नही गंभीर

प्रभाग फेरी – प्रभाग क्र. ३

कचरा वेळच्या वेळी उचलला न जाणे, फेरीवाल्यांनी गिळंकृत केलेले पदपथ, खारघर रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी लोकलच्या वेळेनुसार बससेवा उपलब्ध नसणे, त्यामुळे वाढलेली अवैध प्रवासी वाहतूक असे अनेक प्रश्न प्रभाग क्रमांक ३मधील रहिवाशांना भेडसावत असले, तरीही अपुरा पाणी पुरवठा ही येथील सर्वात मोठी समस्या आहे. खारघर ते तळोजा फेज २ या परिसरात नेहमीच कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्यासारखी मूलभूत गरज भागवण्यासाठी येथील रहिवाशांना दीड किलोमीटर पायपीट करावी लागते.

तळोजा वसाहतीत पाणी ही मोठी समस्या आहे. कमी दाबाने पाणीपुरठा होत असल्याच्या विरोधात सिडकोच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याची वेळ येथील रहिवाशांवर येते. सिडको प्रशासनाने पेठार्ली व भोईरपाडा या गावांमध्ये पाण्याची सोय केली नसल्यामुळे येथील महिलांना उन्हाळ्यात दीड किलोमीटर पायपीट करून तळोजा फेज २ येथील सिडकोच्या जलवाहिनीवर जाऊन पाणी भरावे लागते. पनवेल महापालिकेने पाण्याचे हे दुर्भीक्ष दूर करावे, अशी येथील रहिवाशांची अपेक्षा आहे.

पाचनंद हे गाव स्वतच्या मालकीचे धरण असल्याने काही प्रमाणात पाण्यासाठी सक्षम असले, तरी एकमेकांना खेटून बांधलेल्या घरांमुळे गावातील रस्ते अरूंद झाले आहे आणि वाहतुकीची समस्या दिवसागणिक बिकट होऊ लागली आहे. महापालिकेत हस्तांतर झाल्यानंतर तरी घरांची योग्य रचना केली जाईल आणि पायाभूत सुविधा पुरवल्या जातील, त्यासाठी पुरेशी जागा सोडली जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे. तळोजा गावाचा विकास अनेक वर्षांत झालेला नाही. तळोजा फेज २पासून खारघर येथील मध्यवर्ती कारगृहापर्यंत येण्यासाठी एकमेव रस्ता आहे. त्यावरून पनवेल-दिवा हा लोहमार्ग गेल्यामुळे वसाहतीच्या प्रवेशद्वारावरील लोहमार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम पालिकेने करावे, अशी मागणी तळोजा फेज ३ मधील नागरिक करत आहेत.

सेक्टर ३५मध्ये मांसविक्रीची दुकाने पदपथांवरच थाटण्यात आली आहेत. अरिहंत अभिलाषा या सोसायटीमध्ये राहणाऱ्या हेमंत मोडक यांनी सेक्टर ३५ एच मधील स्मशानभूमीच्या कंपाऊंडची उंची कमी असल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे या परिसरातून ये-जा करणाऱ्यांना नेहमीच अंत्यविधीचे दृश्य पहावे लागते. या भागात पिशवीबंद दुधासाठी अर्धा लिटरमागे दोन रुपये व सुटय़ा दुधासाठी पाच रुपये अतिरीक्त दर आकारला जातो. अशी लूट करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.

अवैध प्रवासी वाहतूक

सेक्टर ३५ मधून खारघर रेल्वेस्थानकात जाण्यासाठी नवी मुंबई परिवहन सेवेची (एनएमएमटी) ५४ क्रमांकाची बससेवा धावते. त्यासाठी १४ रुपये तिकीट आकारले जाते. या बसने ३० मिनिटांत खारघर रेल्वेस्थानक गाठता येते, मात्र लोकलच्या वेळेनुसार बससेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना तासभर ताटकळत राहावे लागते. याचाच गैरफायदा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुमारे १५० इकोव्हॅनचालकांनी घेतला आहे. ते १५ रुपये आकारतात. मात्र एकाच गाडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून वाहतूक केली जाते. बसच्या तिकिटाएवढय़ाच खर्चात आणि सोयीच्या वेळेत प्रवास करता येत असल्यामुळे प्रवासी या अवैध प्रवासालाच प्राधान्य देतात. त्यामुळे पालिकेने नोकरदारांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे, अशी येथील मतदारांची अपेक्षा खारघर सेक्टर ३५ येथील प्रशांत हेळगिरे यांनी व्यक्त केली.

ओवे गावातील शिक्षणप्रश्न गंभीर

कोयना धरणातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ओवे गावाजवळील कॅम्पमध्ये करण्यात आले आणि तेव्हापासून हा परिसर ओवेकॅम्प म्हणून ओळखला जाऊ लागला. पुनर्वसन झालेले कदम, शिंदे, पवार, जाधव हे म्हात्रे, पाटील, ठाकूर या स्थानिकांबरोबर गुण्यागोविंदाने राहू लागले. मात्र या परिसरात सर्वात मोठी समस्या आहे ती शिक्षणाची. ओवे गावात मराठी कुटुंबांसोबत उर्दुभाषिकांचीही संख्या मोठी आहे. येथील उर्दु शाळेमध्येच आंगणवाडी भरविली जाते. यापूर्वीच्या ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने तशी तरतूद केली. परंतु शिक्षणाची गंगा मुलांपर्यंत पोहचविणाऱ्या या खोलीची अवस्था सध्या खुराडय़ासारखी झाली आहे. जून महिन्यात शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेच्या खोल्या रंगविण्यात याव्यात आणि शाळेत शुद्ध पाणी मिळावे, अशी येथील विद्यार्थी आणि पालकांची मागणी आहे. ओवे गावाने मलनिस्सारण वाहिनीचा प्रश्न नुकताच एकजुटीने सोडवला, मात्र येथील शिक्षणाचा प्रश्न कायम आहे.

ओवे गाव, ओवेकॅम्प, तळोजा पाचनंद गाव ते तळोजा पाचनंद वसाहत

२४०६४

लोकसंख्या

२३४०६

एकूण मतदार

१०८६२

स्त्री मतदार

१२५४४

पुरुष मतदार