जगातील विविध देशांचे दूतावास आणि तेथील कर्मचाऱ्यांची वसाहत एकाच ठिकाणी व्हावी यासाठी ऐरोली येथे २७ हेक्टर जमीन राखीव ठेवून गेली सात वर्षे प्रतीक्षेत असलेले आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्र अखेर रद्द करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या जागी आता सिडको एखादी सुंदर नागरी वसाहत उभी करण्याचा विचार करीत आहे. फॅशन टेक्नॉलॉजीला ही जागा महाग वाटल्याने त्यांनी ती नाकारली, तर जेम्स आणि ज्वेलरी उद्योजकांना ही जागा पसंत पडली नाही. त्यामुळे सिडकोने या ठिकाणी एक थीम नगरी उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत विविध ठिकाणी विखुरलेले आंतरराष्ट्रीय दूतावास बीकेसीप्रमाणे एकाच ठिकाणी उभारण्यात यावेत यासाठी सिडकोने सात वर्षांपूर्वी ऐरोली सेक्टर दहा अ मधील २७ हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे.  त्यासाठी गटार, रस्ते या सुविधांवर दहा कोटी रुपये खर्चदेखील करण्यात आला आहे. खाडीलगत असलेल्या या जागेजवळूच विस्तारित पामबीच मार्ग जात असल्याने या जागेला आंतरराष्ट्रीय दूतावास पसंती देतील अशी आशा होती, मात्र ३८ दूतावासांपैकी केवळ दक्षिण आफ्रिका, दुबई आणि सिंगापूर या देशांतील दूतावासांनी येथील भूखंड घेण्यात रस दाखविला होता. केवळ दूतावास कार्यालय न ठेवता उच्च दर्जाची सुरक्षाव्यवस्था असलेली निवासी वसाहत उभारण्याचा सिडकोचा मानस होता. त्यासाठी प्रत्येक देशाला त्यांच्या पसंतीनुसार विकास आराखडा तयार करण्याची मुभा देण्यात येणार होती, मात्र बोटावर मोजण्याइतक्या दूतावासांनी यात रस दाखविल्याने सिडकोने हा प्रकल्पच गुंडाळण्याचा निर्णय घेतला असून ही जमिनीवर एखादी सुंदर नगरी उभारण्याचे ठरविले आहे.

या ठिकाणी फॅशन टेक्नॉलॉजी सुरू करण्यात यावी, असे नगरविकास विभागाचे मत होते; पण त्यांना ही जागा सिडकोच्या बाजारभावाने परवडत नसल्याचे त्यांनी कळविले आहे. याच वेळी हिरे, सोने व्यापाऱ्यांना एकाच ठिकाणी बाजारपेठ निर्माण करता यावी यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते; पण खाडीकिनारी असलेली ही जमीन सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याने ती नाकारण्यात आली आहे. त्यामुळे सिडको आता या ठिकाणी थीम सिटी उभारणार असून त्याचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

ऐरोली येथील आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्राला गेली अनेक वर्षे वाट पाहिल्यानंतरही योग्य असा प्रतिसाद प्राप्त झाला नाही. त्यामुळे ती जमीन आता एखाद्या थीम नगरीसाठी वापरली जाणार आहे. या ठिकाणी फॅशन टेक्नॉलाजी आणि जेम्स अन्ड ज्वेलरीकडेही विचारणा करण्यात आली होती.

– भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको