तळोजा औद्योगिक वसाहतीमधील रामकी ग्रुपच्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीने नवीन प्रकल्पाचे ३० एकर जमिनीवरील काम न थांबविल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलन करत मोर्चाचे हत्यार उपसले आहे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंटसह सिडको प्रशासनाच्या नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पामुळे येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून प्रदूषणाला तोंड देत असल्याने हे प्रदूषण बंद करण्यासाठी मागील ३ महिन्यांपासून तळोजातील गावांगावांमधील जनजागृती केल्यानंतर वारकरी सांप्रदायातील कीर्तनकारांच्या नेतृत्वाखाली आणि काही राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन मंगळवारी सकाळी १० वाजता रामकी ग्रुप कंपनीच्या प्रवेशद्वारावर धडक मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे. ग्रामस्थांनी या आंदोलनाला ‘श्वासाचा लढा’ असे नाव देत, सदगुरू वामनबाबा महाराज प्रदूषणविरोधी संघर्ष समिती स्थापन केली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता ग्रामस्थ गॅलेक्सी कंपनीसमोर जमणार असल्याचे या संघर्ष समितीने जाहीर केले आहे.
तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचा यापूर्वी ७० एकर जमिनीवर आपला प्रकल्प चालवीत असून यामध्ये टाकाऊ रसायने शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी या प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिली आहे. कंपनीच्या वतीने ३० एकर जमिनीवर अशाच प्रकारचा टाकाऊ रसायने विघटनांचा प्रकल्प राबविण्याचे काम सूरू असल्याने मुं.वे.मॅ. कंपनीच्या प्रकल्पामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी कीर्तनकारांच्या माध्यमातून एकजूट सुरू केली.
तळोजा परिसरातील भूगर्भातील पाणी अशुद्ध, ग्रामस्थांना श्वासाच्या रोज भेडसावणाऱ्या समस्या आणि कृषी नापीक होणे या तीन महत्त्वाच्या समस्या असल्याने हे आंदोलन हाती घेतल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष कीर्तनकार धनाबुवा पाटील यांनी सांगितले आहे. अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने या ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलकांनी मोर्चाचे हत्यार उपसले आहे.
आजही कंपनीचे ३० एकर जमिनीवर काम सुरु असल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. कीर्तनकार बंडातात्या कराडकर, प्रकाश जवंजाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
या आंदोलनाला मोठय़ा संख्येने तळोजातील सर्व गावांतील ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने रामदासबुवा पाटील आणि गोपीनाथ पाटील यांनी केले आहे. एकीकडे ग्रामस्थांची प्रदूषण मुं.वे.मॅ. कंपनीमधून होत असल्याची ओरड सुरू असताना या कंपनीने आमच्या प्रकल्पामुळे कोणतेही प्रदूषण होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

स्त्रिया व बालके यांचा आंदोलनात सहभाग
तळोजातील प्रदूषणकारी कारखान्यांमध्ये मुं.वे.मॅ. कंपनीने ३० एकर जमिनीवर प्रकल्पाचे काम थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील यांनी केली होती. मात्र शेकापच्या व ग्रामस्थांच्या या मागणीला कोणताही प्रतिसाद प्रशासनाने दिला नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना या आंदोलनात सक्रिय होण्याचे साकडे घातले. आमदार ठाकूर यांनी तळोजातील प्रदूषणाचा प्रश्न विधिमंडळात मांडला. त्यानंतर पर्यावरण विभागाचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी प्रदूषणकारी कारखान्यांचा शोध घेऊन प्रत्यक्षात प्रदूषण होत असल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करा, असे आदेश एमपीसीबीला दिले आहेत. मात्र आजपर्यंत परिसरातील प्रदूषण थांबले नाही आणि मुं.वे.मॅ. कंपनीच्या नवीन प्रकल्पाचे कामही थांबलेले नाही. प्रदूषणाची परिस्थिती जैसे थे राहिल्याने आजही सकाळी व रात्री या परिसरात प्रदूषणाचा त्रास कायम असल्याने या परिसरातील स्त्रिया, बालके यांचा या मोर्चात मोठय़ा प्रमाणात सहभाग असण्याची शक्यता आहे.