‘आयुक्त हेकेखोर’, ‘आयुक्त अपमान करणारे’, ‘आयुक्त प्रसारमाध्यमांत चमकण्याचा प्रयत्न करणारे’, ‘आयुक्त प्रकल्पग्रस्तविरोधी’, ‘आयुक्त विकासाच्या आड येणारे’ अशी एक ना अनेक दूषणे लावून नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडून मंजूर करण्यात पालिकेतील नगरसेवक, राजकारण्यांना यश आले असले तरी, नवी मुंबईतील बहुसंख्य जनता मुंढे यांच्या बाजूने उभी आहे. मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर ‘लोकसत्ता’ने मंगळवारी आपली भूमिका मांडताना ‘तुमचा ठराव कोणता?’ असा प्रश्न नवी मुंबईकरांना केला होता. त्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मुंढे यांच्याविरोधातील कारवाईबाबत ‘लोकसत्ता महामुंबई’ने नागरिकांकडून प्रतिक्रिया मागवल्या होत्या. त्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत ‘लोकसत्ता महामुंबई’च्या ईमेलवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. एखाद्या प्रतिक्रियेचा अपवाद वगळता सर्वच्या सर्व प्रतिक्रिया मुंढे यांना पाठिंबा देणाऱ्या होत्या. लोकप्रतिनिधींनी पालिका आयुक्तांविरोधात आणलेला ठराव हा जनतेचा विश्वासघात करणारा आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. मुंढे यांना पालिका आयुक्तपदी कायम ठेवावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्य़क्त केली. नागरिकांच्या प्रतिक्रिया..

नवी मुंबईकरांचा विश्वास ठराव!

पालिकेतील भ्रष्टाचार उघडय़ावर आला, शहरातील बेकायदा बांधकामे पाडण्यात आली, पदपथावरील फेरीवाले हटले आणि पालिकेत राजकारणी खुर्चीवरून हलले. एरवी समस्या सोडविण्यासाठी कधीही एकजूट न दाखवणाऱ्या नगरसेवकांनी आपापल्या पक्षनेत्यांच्या आदेशावरून एकदिलाने अभद्र युती केली. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वासाचा ठराव १०४ मतांनी मंजूर झाला. यावर विजयी मुद्रेने नगरसेवकांनी सभागृहात फलकबाजी केली; परंतु जनतेच्या हृदयात अढळ स्थान मिळविलेल्या मुंढे यांच्या समर्थनार्थ थेट अमेरिकेतील मराठी भाषकांनी ‘लोकसत्ता महामुंबई’ला प्रतिक्रिया कळवली. नवी मुंबईकरांची लेखणीही यात मागे राहिली नाही. या साऱ्या प्रतिक्रियांमध्ये मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांमागे जनतेने आपली ताकद उभी केली आहे.

 

कर्तव्यकठोर राहण्याचे फळ केवळ मुंढे यांनाच मिळाले असे समजून शांत बसणाऱ्या नवी मुंबईकरांना मला एवढेच सांगायचे आहे, की हा अविश्वास इथल्या नागरिकांवरच दाखविण्यात आला आहे. आम्हाला भ्रष्टाचारमुक्त नवी मुंबई पालिका हवी आहे आणि तो आमचा अधिकार आहे. त्यासाठी आम्हाला मुंढेंची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याच्या मागे राहावे.

* महेश डुंबरे

सरकारने आमची शंभर टक्के जमीन घेतली आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन उरलेले नाही. गरजेपोटी आम्ही घरे बांधली. तीच घरे मुंढे यांनी बेकायदा ठरवून पाडण्याचे आदेश दिले आहेत. आमच्यासाठी त्यामुळे निवारा कुठे आहे. उदरनिर्वाहासाठी घरे भाडय़ाने दिली आहेत. तीच तुटली तर आम्ही काय करायचे.

* समीर पाटील

नवी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारात आकंठ बरबटलेले, कायद्यांना फाटा देत नियम पायदळी तुडवणाऱ्यांना मुंढेंवर अविश्वास ठराव आणून आनंद झाला असेल, पण सर्व नागरिक मुंढेंच्या पाठीशी उभे आहेत. मुंढेंनी पुन्हा एकदा नागरिकांच्या मनावर राज्य केलं आहे.

* महेश लोखंडे, कामोठे

चोरांना पोलीस नकोच असतात. मग चोर नगरसेवक आणि त्यांच्या नेत्यांना पालिकेत स्वच्छ आणि कर्तव्यदक्ष आयुक्त चालेल कसा? नवी मुंबईकरांना आयुक्त मुंढे चालतील, यात तीळमात्र शंका नाही.

* निखिल जाधव

भ्रष्टाचाराने बरबटलेले राजकीय वातावरण स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष सनदी अधिकाऱ्याचा बळी जाणार असेल तर जनतेसाठी ती मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी आशा आहे.

* रमेश एस. जाधव

एका स्वच्छ आणि प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरोधात काही दिवसांत इतके राजकारणी एकवटू शकतात, याचा अर्थ भविष्यात निवडणुकांच्या माध्यमातून जनतेला चांगला राजकीय नेता निवडणे जवळपास अशक्य होणार आहे, हे नक्की.

* सर्वेश

आयुक्त मुंढे यांना हटविण्याच्या प्रकाराने हे दाखवून दिले आहे की जोपर्यंत या देशात, देशहितापेक्षा पक्षहित मोठे मानतात, जोवर जनहितापेक्षा पक्षहित मोठे मानतात, जोवर पक्षहितापेक्षा स्वहित मोठं मानतात, तोपर्यंत या देशाचा प्रवास परदास्याकडेच होत राहणार. आजमितीला नेत्यांनी कंत्राटी कामगारांना हाताशी धरून स्वत:चा उद्देश साध्य करण्यासाठी नवी मुंबई ही कचरानगरी बनविली आहे. यापासून दुसऱ्या काय अपेक्षा बाळगणार?

* अरविंद खानोलकर, सीबीडी बेलापूर

नियम आणि कायदा हे दोन शब्द राजकारण्यांच्या पचनी पडत नाहीत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तर दोनच शब्दांच्या जोरावर नवी मुंबई पालिकेचा कारभार चालवला. त्यामुळे कुजक्या राजकारण्यांचे स्वच्छ कारभारामुळेच पोट अक्षरश: फुगून मंगळवारी फुटले.

* अतुल पांडे

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अविश्वास ठराव आणणे यामागे मोठे अर्थकारण आहे. अविश्वास ठराव आणणाऱ्या या कौरवांचा आम्ही निषेध करतो. या लोकप्रतिनिधींच्या कामाचा लेखाजोखा तपासल्यास अनेक गोष्टी उघडकीस येतील. त्यातून ते दोषी आढळल्यास त्यांना घरी पाठवावे. अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने असे प्रकार घडतात. तुकाराम मुंढे यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे.

* प्रमोद गाजिनकर

नवी मुंबईच्या विकासात आयुक्त तुकाराम मुंढे यांचे चांगले योगदान आहे. ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या ते अपचनी पडणारच. जनतेचा पाठिंबा असणाऱ्या हा अधिकारी नवी मुंबईसाठी हवाच. या अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांनीही पाठिंबा द्यावा असे वाटते. तरच अच्छे दिन. असे म्हणता येईल. तसे झाले नाही तर येणाऱ्या निवडणुकीत ‘नोटा’चा वापर करून अशा अपप्रवृत्तीचा निषेध करण्याची वेळ येईल.

* शरद पवार

जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलेल्या पालिका सदस्यांनी स्वत:च्या तुंबडय़ा भरण्यासाठी अधिकाराचा वापर करून तुकाराम मुंढेंना हटविण्याचा प्रयत्न केला. काही विकासक, राजकीय नेते, काही संधिसाधू प्रकल्पग्रस्त मुंढे यांना विरोध करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अधिकाराचा वापर करून या ठरावाला केराची टोपली दाखवावी.

* रवि बांदल, वाशी

मुंढे यांनी पाच/साडेपाच महिन्यांच्या कालावधीत बेकायदेशीर कामांवर कारवाईचा बडगा उचलला. त्याचप्रमाणे पालिकेतील गैरकारभारांना आळा घालताना, त्यात बरेच राजकीय नेतेही दुखावले गेले. अशा राजकीय नेत्यांना परत बोलावण्याची वेळ आली आहे. मतदारांनी निवडून दिलेल्या उमेदवाराला परत बोलावण्याची तरतूद निवडणूक प्रणालीत समाविष्ट केल्यास अशा राजकारण्यांवर अंकुश राहील.

* रविकांत तावडे, नवी मुंबई

इतक्या कार्यक्षम मुंढेंना हटवण्याचा प्रकार राजकारणात नवीन नाही. स्वच्छ प्रतिमेचे नेते किंवा अधिकारी नकोसे होतात. कारण त्यांच्यामुळे खाणाऱ्यांचे नुकसान होते. आश्चर्य एवढेच वाटते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे का मूग गिळून बसले आहेत? त्यांच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत.

* शीला बर्डे, अमेरिका

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर नगरसेवकांनी अविश्वासाचा ठराव मंजूर केला म्हणून काय झाले. आमचा त्यांच्यावर कायमच विश्वास आहे व पुढेही राहील. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

* संतोष कदम

कार्यक्षम मुंढेंना हटवण्याचा प्रकार राजकारण्यांची हीन प्रवृत्ती दर्शविते. स्वच्छ प्रतिमा असलेले आयुक्त खाणाऱ्यांच्या आड आले. त्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला.तरीही नवी मुंबईकर मुंढे यांच्या मागेच खंबीरपणे उभे राहणार आहेत, यात शंका नाही.

* जसविंदर सिंग

पालिकेत खा, खा खाणाऱ्या नगरसेवक आणि त्यांच्या हुकूमशहांना मुंढे  नकोयत; पण त्यांनी ध्यानात ठेवावं की जनता एकत्र आली तर परिवर्तन घडू शकते.

* कपिल बी.

मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला चांगल्या कामासाठी कोण्या राजकारण्याने नाडवता कामा नये. राजकारणी चोर आहेत. ते उलटय़ा बोंबा मारणारच आहेत. अशा नाजूक स्थितीत लोकशाही जिवंत राखण्याचे काम वृत्तपत्रे आणि नागरिकच करू शकतात.
* अशोक सावंत, नवी मुंबई  

मुंढेंनी नवी मुंबईत अनेक नियोजनबद्ध विकासकामे केली. एमएमआरडीच्या अखत्यारीत येणाऱ्या गावठणच्या विकासाच्या कामात मुंढेंचा काहीच दोष नाही त्यांना त्यात गोवू नये.

* समीर पाटील, नवी मुंबई

राजकारण्यांच्या आशीर्वादाने नवी मुंबईतील बहुतेक पदपथ बेकायदा फेरीवाल्यांनी व्यापले होते. त्यामुळे त्यावर चालण्याचा नागरिकांचा अधिकार हिरावून घेतला गेला. तो परत मिळवून देण्याचे धाडस जर मुंढे यांनी केले असेल तर त्यांना पाठिंबा देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला कर्तव्यदक्ष नागरिकच टिकवू शकतील.

* श्याम देशपांडे

आयुक्त भेट देत नाहीत, हे काय अविश्वास ठराव आणण्यासाठीचे कारण ठरेल काय? अहंकारी लोकांनी अत्यंत क्षुद्र कारणासाठी ठरावाचा घाट घातला. त्यामुळे नगरसेवकांकडून काही चांगली अपेक्षा करण्यात अर्थ नाही. हुकूमशहांच्या ताटाखालची मांजरे असलेल्या पालिका सदस्यांनी ‘नगरसेवक’ या मौल्यवान शब्दाचा मंगळवारी अपमान केला आहे.

* अनिलकुमार उबाळे, कोपरखैराणे

लोकांच्या कररूपी पैशावर राजकारणी पोसले गेले आहेत. सत्तेत आल्यानंतर उधळपट्टी हाच त्यांचा व्यवसाय असतो. त्यांना जगण्यासाठी असेच धंदे उपयोगी पडतात. नवी मुंबईतही गेली काही वर्षे हेच घडत होते. त्याला मुंढे यांनी विरोध केला. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली.

* मंगेश सुर्वे

लाज वाटावी अशीच स्थिती आहे. २१व्या शतकातील शहरात गलिच्छ राजकारण्यांनी जे धाडस दाखवलं त्याला प्रत्युत्तर म्हणून जनतेने त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलने करायला हवीत. त्यांना जाब विचारायला हवा; परंतु दुर्दैवाने नवी मुंबईत हे घडणार नाही.

* योगेश वानखेडे

नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे. नगरसेवक जर खरंच प्रामाणिक असते तर प्रस्तावाला विरोध केला असता, पण तसे झाले नाही. गो. रा. खैरनार, टी. चंद्रशेखर यांच्याबाबतीतही असाच प्रकार झाला होता. जनतेला आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी आशेचा किरण म्हणून तुकाराम मुंढे भेटले होते. त्यांच्या जाण्यामुळे हे शहर परत बकाल आणि पोरक्या अवस्थेकडे मार्गक्रमण करेल अशी भीती या शहरातील जनतेला वाटत आहे. त्यामुळे ज्यांना शहराच्या योजनाबद्ध विकासापेक्षा,  शहरातील नागरिकांच्या समस्यांपेक्षा आपले हितसंबंधच अधिक महत्त्वाचे वाटतात, त्यांनीच आयुक्त मुंढे याना हटवले, असेच या अविश्वास प्रस्तावातून दिसून येते.

* अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण</strong>

अविश्वास ठरावाला भ्रष्ट युती कारणीभूत

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘अविश्वास ठराव’ निमित्ताने सर्वपक्षीय भ्रष्टाचारी राजकारणी (भाजप वगळता) व लुटारू बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार एकत्र आले हे आता सिद्ध झाले आहे. ही बाब नवी मुंबईच्या विकासाला रसातळाला घेऊन जाणारी आहे. अत्यंत अभद्र अशा या युतीला वेळीच ठेचण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. मुंढे यांच्यासारख्या अशा कित्येक कर्तबगार अधिकाऱ्यांना त्यांच्या बेधडक पण चांगल्या कामाला कायमचा पाठिंबा मिळण्याची ठोस शासनव्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. अशा प्रसंगी जनमत चाचणी, सह्य़ांची मोहीम व वर्तमानपत्रीय जागर मुंढे यांना वाचवू शकेल काय?

* सुभाष अंतू खंकाळ, सेक्टर १५, ऐरोली.       

अनुभवी आणि कर्तव्यदक्ष असलेले नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव कशासाठी? जनतेचा पाठिंबा असलेले आयुक्त केवळ लोकप्रतिनिधींचे हितसंबंध जपू शकले नाहीत म्हणून त्यांना या अविश्वासाच्या ठरावाला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्र्यांनी राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता हा ठराव रद्द करून कर्तव्याशी प्रामाणिक तुकाराम मुंढे यांचे आयुक्तपद कायम ठेवावे तरच शहराचा विकास होईल.

* गजानन पालसोडकर

मुंढेंच्या विरोधातील अविश्वास ठराव आम्हाला मान्य नाही. स्वच्छ प्रशासन देणाऱ्या आयुक्तांचा खरा त्रास भ्रष्ट राजकारण्यांना झाला आहे.

* प्रसाद दीक्षित

तुकाराम मुंढे हे माझे आदर्श आहेत. मी सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे. सनदी अधिकारी झाल्यावर मला मुंढेंसारखेच काम करायचे आहे.

* महेश पवार

राजकीय कारणांवरून मुंढे यांना पदावरून कधीच हटवता येणार नाही. जनतेसाठी ते हवे आहेत. सरकारला त्यांना पाठिंबा द्यावाच लागेल.

* श्यामा पंडित, सीबीडी बेलापूर

तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वासाचा ठराव बेकायदा आहे. त्यांना आमचा पाठिंबा आहे.

* दिनेश खैरनार

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कुठल्याही सबळ कारणाशिवाय मंजूर करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव कोणाही संवेदनशील नागरिकाला खटकणाराच आहे.  प्रामाणिक अधिकारी मंडळी ही संख्येने अल्प असल्यामुळे हितसंबंधाला बाधा पोहचणाऱ्यांच्या डोळ्यात ती खुपते. हा अविश्वास प्रस्ताव मुंढे या व्यक्तीविरोधात नसून ‘प्रामाणिक’ या वृत्तीविरोधात आहे. ‘सुराज्या’चे खरे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘मुंढे’ कार्यसंस्कृतीचा अवलंब करणे आज गरजेचे आहे. लोकप्रतिनिधीपेक्षा कर्मचाऱ्यांना अधिक अधिकार आहेत. कर्मचाऱ्यांनी ते प्रामाणिकपणे वापरावे, राजकीय पक्ष जरी विरोधात गेले तरी जनता तुमच्या बाजूने उभी राहील. मुख्यमंत्र्यांनी केवळ मुंढे यांना अभय न देता कायद्यानुसार सेवा न देणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर शासनाने अविश्वास प्रस्ताव आणावा  हा बदल जनतेसाठी स्वागतार्ह ठरेल.

* अमोल पोटे, विद्यार्थी

नवी मुंबई शहरातील ८० टक्क्य़ांहून अधिक लोकांचा तुकाराम मुंढे यांना पाठिंबा आहे. केवळ ते संघटित होऊ  शकले नाहीत. मुंढे हे यापुढेही भ्रष्टाचार, बेकायदा बांधकामे आणि फेरीवाल्यांच्या विरोधातच राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांच्या पाठीशी उभे राहावे.

* नितीन देसाई

मुंढेंनी आम्हाला खरोखरच प्रभावित केले आहे. त्यांच्यासारखा अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर सनदी अधिकारी मिळणे हे प्रत्येक नवी मुंबईकराचे भाग्य आहे.

* स्नेहल पाथरे, वाशी