रंगदर्पण मांद्रे, गोवा या संस्थेच्या वतीने निर्मिती करण्यात आलेले ‘पुन:श्च’ या नाटकाचा प्रयोग गुरुवार, २१ जानेवारीला सायंकाळी सात वाजता पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात होत आहे.
५५व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकाचे लेखक नारायण आशा आनंद हे आहेत. त्यांनीच या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
चोरीची हौस असलेला एक महत्त्वाकांक्षी निर्माता होळीचा मुहूर्त साधून अख्खा नाटककार चोरतो; परंतु नाटकाकार एक मध्यमवर्गीय मराठी प्राध्यापक असल्यामुळे त्याच्याजवळ नाटकासाठी लागणारी नवी गोष्ट नाही. कथेची अडचण दूर करण्यासाठी निर्माता त्याच्या भावाच्या गुप्तहेर एजन्सीला एक उत्तम गुप्तहेर ईडिपसला कामाला लावतो.
त्याने गोळा केलेली एक विस्कळीत गोष्ट म्हणजे ‘पुनश्च’ हे नाटक. या नाटकात संजय गावकर, सोबिता कुडतरकर, ज्योती पांचाळ-बागकर, नारायण आशा आनंद, अंकुश पेडणेकर, उगम जांबवलीकर, महादेव सावंत, जयेश बागकर यांनी भूमिका साकारल्या आहेत. या नाटकाला गोव्यात झालेल्या प्राथमिक फेरीत प्रथम पारितोषिक मिळाले होते.