तालुक्यातील विमानतळ बाधित गावे प्रस्तावित पनवेल शहर महानगरपालिकेतून का वगळली आणि या महापालिकेमुळे ग्रामीण व शहरी पनवेलकरांच्या जीवनमानावर कितीसा कराचा बोजा पडणार आहे यासाठी शेतकरी कामगार पक्षाने अभ्यास समिती स्थापन केली असून या समितीमध्ये विधिज्ञांपासून ते महानगरपालिकेच्या कायद्यातील तज्ज्ञांचा समावेश केला आहे. या समितीने दिलेल्या मतांवर शेकाप रायगडचे जिल्हाधिकारी यांच्यासमोर पनवेल शहर महानगरपालिकेला विरोधाबाबत आपल्या हरकती नोंदविणार असल्याचे मत आज माजी आमदार विवेक पाटील यांनी जाहीर केले. भारतीय जनता पक्षाने स्वत:च्या मतांच्या सोयीसाठी आणि पनवेल नगरपरिषदेचे शल्य लपविण्यासाठी सामान्यांवर महानगरपालिकेच्या रूपात कराचा बोजा लादल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला आहे.

या महापालिकेची खरेच पनवेलकरांना आज गरज आहे का, याविषयी शेकापची अभ्यास समिती काम करणार आहे. येत्या पाच दिवसांत या समितीचे प्रत्यक्षातील काम सुरू होईल असे शेकापच्या वतीने सांगण्यात आले. शेकापच्या या महानगरपालिकेच्या विरोधातील लढाईत काही राजकीय पक्षांची साथ मिळत असल्याचेही शेकापने स्पष्ट केले आहे. मात्र हे पक्ष कोण आहेत याबाबत अजून स्पष्टता केलेली नाही.

पनवेल शहर महानगरपालिकेची अधिसूचना सरकारने काढल्यावर पनवेलमध्ये राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे. मोदींचा प्रभाव आजही जनसामान्यांवर आहे असा इरादा ठेवत भाजपने पनवेलची महानगरपालिका करण्यासाठी सरकार दरबारी जोर धरला होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच शेकाप या महापालिकेला विरोध करत आहेत. सरकारने प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेसाठी स्थापन केलेल्या अभ्यास समितीने विमानतळाचा प्रकल्प होणाऱ्या जमिनीवरील गावे का वगळली याबाबत कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे उत्तर नाही.

‘नकाशा कोणाच्या सांगण्यावरून’

पनवेल तालुक्यातील नागझरी, चाळ, शिलोत्तर, रायचूर ही महसूल गावे आहेत. मात्र वडघर, करंजाडे, चिंचपाडा यांसारखी अनेक गावे पनवेल शहराला खेटून असली तरीही या गावांचा समावेश केला नसल्याने हा पनवेल महानगरपालिकेचा नकाशा कोणाच्या सांगण्यावरून आणि का तयार केला याचा जाब शेकाप विचारणार असल्याचे माजी आमदार पाटील म्हणाले. यासाठी संबंधित ग्रामपंचायतींचे ठराव सरकारकडे जमा करण्यासाठी शेकापच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सामान्य मतदारांच्या जिवावर भाजप सरकारमध्ये नेतृत्व करीत असल्याने महानगरपालिकेच्या स्थापनेमुळे एलबीटीसारखा कर वाढल्यास सामान्यांची महागाई वाढेल अशी भीती शेकापने व्यक्त केली आहे. एकीकडे पनवेलच्या भाजपच्या गोटात महानगरपालिकेच्या प्राथमिक अधिसूचनेच्या घोषणेमुळे आनंदाचे वातावरण आहे तर शेकाप व त्यांचे मित्रपक्ष महागाई व कराचा बोजा सामान्यांच्या अंगावर पडेल याबाबत तालुक्यात जनजागृती करण्याची आखणी करत आहेत.