पनवेलमध्ये मतमोजणीमुळे हार २०० रुपये, लिंबू सरबत २० रुपये

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीसाठी गुरुवारी पनवेल येथील व्ही. के. हायस्कूलचे मैदान विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी फुलून गेले होते. शेकाप आणि भाजप या दोन पक्षांत खरी लढत असल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना दोन टोकांकडून प्रवेश दिला गेला होता. आपला उमेदवार निवडून आल्याचे जाहीर होताच कार्यकर्ते गुलाल, फटाक्यांची आतषबाजी करीत परिसर दणाणून सोडत होते. हार विकणाऱ्यांनी हारांची किंमत दोनशे रुपये तर लिंबू सरबत विकणाऱ्यांनी एक ग्लास सरबताची किंमत २० रुपयांपर्यंत वाढवली होती. कडाक्याचे ऊन असूनही कार्यकर्त्यांची गर्दी लक्षणीय होती.

रायगड जिल्ह्य़ात होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह प्रेक्षणीय असतो. शेकापचा बालेकिल्ला असणाऱ्या या जिल्ह्य़ात आता अन्य पक्षांनीही शिरकाव केला आहे. त्यामुळे तरुणांची मते विभागली गेली आहेत. खासदार रामशेठ ठाकूर यांनी भाजपची धुरा खांद्यावर घेतल्यापासून तरुणांचे जथे या पक्षाकडे वळल्याचे दिसत आहेत. गुरुवारी झालेल्या या मतमोजणीच्या वेळी पनवेल उड्डाणपुलाजवळ तरुणांनी गर्दी केली होती. त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी गुलाल उधळला जात होता, फटाक्यांच्या माळा लावल्या जात होता. घोषणांनी परिसर दणाणून जात होता. पलीकडे शेकापच्या गोटातही हेच दृश्य होते.

उरणमध्ये आनंदोत्सव 

नवी मुंबई उरणमध्ये दुपारी १२पर्यंत कोणताच निकाल जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांची धाकधुक वाढली होती. समाजमाध्यमांवर हा उमेदवार विजयी तो पराजित असे संदेश येत होते. त्यानुसार पक्षांची घोषणाबाजी, जल्लोष व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

दुपारी १ वाजता उरणमधील जासई गणाचा निकाल जाहीर झाला यात शेकाप विजयी झाल्याने शेकापचे लाल झेंडे फडकू लागले. त्यानंतर नवघर मधून शिवसेना आघाडीवर असल्याची माहिती आल्यामुळे सेनेचे भगवे झेंडेही फडकू लागले.

नवघर पंचायत समितीत अटीतटीची लढत सुरू झाल्याने भाजपानेही घोषणाबाजी सुरू केली. तर थोडय़ाच वेळात भाजपाने चाणजे जिल्हा परिषद जिंकल्याचा संदेश आल्याने भाजपानेही विजयोत्सव सुरू केला. फटाक्यांची आतषबाजीही सुरू झाली. विजयी झालेल्या उमेदवारांना कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारले. संपूर्ण परिसरात घोषणाबाजी सुरू होती. तर ज्या पक्षांच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यांनी हळूच काढता पाय घेतला. पोलिसांनी यावेळी विजयी व पराभूत उमेदवार वेगवेगळ्या वाटेने जातील आणि कोणताही वाद होणार नाही, याकडे लक्ष दिल्याने निवडणूक शांततेत पार पडली. मिरवणूकांना बंदी असल्याने कोणत्याही पक्षाला मिरवणुका काढता आल्या नाहीत.