रायगड जिल्हा परिषदेच्या आठ व पनवेल पंचायत समितीच्या सोळा जागांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या ६२ उमेदवारांचे आणि त्यांच्या नेत्यांचे राजकीय भवितव्य गुरुवारी दुपापर्यंत स्पष्ट होणार आहे. पनवेल तालुक्यातील शेकाप व भाजपमधील विळ्या-भोपळ्याचे नाते लक्षात घेता, नवी मुंबई पोलिसांनी एका साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदशनाखाली २२० पोलिसांची कुमक व एक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात ठेवली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी या दोन पक्षांतील कार्यकर्त्यांत दगडफेक झाली होती. पनवेल शहरातील विखे हायस्कूलच्या प्रांगणात गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी २८ टेबल मांडण्यात आले असून ११० महसुली कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. पनवेलचे प्रांताधिकारी भरत शितोळे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहतील.

शेकापचे माजी आमदार विवेक पाटील व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची कर्मभूमी असलेल्या पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागाचा कल गुरुवारी स्पष्ट होणार आहे. काही महिन्यांतच पनवेल महापालिकेच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. त्याची झलकही या निवडणुकीच्या निमित्ताने दिसणार आहे. शेकाप आपला गड राखणार की भाजप शेकापचे बुरुज ढासळवणार हे कळणार आहे.

  • मतमोजणीचे ठिकाण- विखे हायस्कूल, पनवेल शहर
  • वेळ – सकाळी १० पासून १.३० पर्यंत
  • एकूण उमेदवार- ६२
  • एकूण कर्मचारी ११०
  • साहाय्यक पोलीस आयुक्त- १
  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक- २
  • पोलीस उपनिरीक्षक – ४
  • पोलीस कॉन्स्टेबल- २२०