सात महिन्यांपूर्वी दोन लाख ४० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पनवेल नगर परिषदेचा अभियंता राजेश कर्डिले याला प्रशासनाने पुन्हा सेवेत रुजू करण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल नगर परिषदेच्या प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी सांगितले.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री निधीतून मंजूर करून आणलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामातील कंत्राटदाराकडून बिले मंजूर करण्यासाठी दोन लाख ४० हजार रुपयांची लाच मागितली आणि त्यातील काही रक्कम नगर परिषदेत स्वीकारल्याने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कर्डिले यांना मुद्देमालासह पकडले होते. गुरुवारपासून कर्डिले नगर परिषदेत सेवेत पुन्हा रुजू झाले.

निर्णय जनहिताचा

बांधकाम विभागात असताना नगरपालिका सदस्यांनी वेळोवेळी कर्डिलेसमोर समस्यांची निवेदने देऊनही वेळकाढूपणा करणाऱ्या कर्डिले याला मुख्याधिकारी चितळे यांनी कायद्याचा दाखला देत गुरुवारपासून पाणी पुरवठा विभागात नेमले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी जनसामान्यांच्या महसुलातून मिळणाऱ्या रकमेतून कर्डिले याला घरबसल्या ५० टक्के वेतन द्यावे लागत होते त्याऐवजी या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कर्डिले याला अकार्यकारी पदावर नेमून त्याच्याकडून पूर्ण काम करून घेतले जाईल. त्यामुळे ही जनहिताचा निर्णय घेतल्याचे सांगितले.