विमानतळ स्थलांतराच्या मुद्दय़ावरून विकासकांमध्ये अस्वस्थता; घरांच्या किमती घसरणार

प्रकल्पग्रस्तांच्या असहकारामुळे नवी मुंबई विमानतळ स्थलांतरित करण्याच्या शक्यतेने बांधकाम क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. नवी मुंबईतून विमानतळ कल्याणनजीक नेवाळी गावात गेल्यास बांधकाम क्षेत्रात आणखीन मंदीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बांधकाम व्यावसायिकांनी सरकारने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. २० वर्षांपासून विमानतळ सुरू होणार असल्याने सिडको आणि जमीनमालकांनी जमिनीच्या दरात अवाजवी वाढ केली. याच वेळी विकासकांनी घरांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवल्या.

नवी मुंबई विमानतळ उभारणीची प्रक्रिया सुरू झाली असून सिडकोच्या अखत्यारीतील स्थापत्यकामांना सुरुवात झाली आहे. अशा वेळी सिडकोला सहकार्य करण्याऐवजी प्रकल्पग्रस्त नेत्यांनी काही नवीन मागण्या पुढे केलेल्या आहेत. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील साडेतीन हजार प्रकल्पग्रस्तांना सिडकोने देशातील सर्वोत्तम पॅकेज दिलेले आहे. प्रारंभी या पॅकेजवर अनुकूलता दर्शविणाऱ्या प्रकल्पग्रस्त नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात नवीन मागण्या केल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आलेल्या साडेतीन हजार प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त अधिक असलेल्या प्रकल्पग्रस्तांनाही सुविधा देण्याच्या मागणीचा समावेश आहे. यावरून सिडकोने प्रकल्पग्रस्तांशी संवाद थांबवला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेत नरमाई न आल्यास विमानतळ रद्द करण्याचे सूतोवाच केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी केले आहे.

बांधकाम क्षेत्रात सध्या कमालीची आर्थिक मंदी आहे. घरे आणि व्यावसायिक गाळे विकले जात नसल्याचे चित्र आहे. त्यात विमानतळ रद्द होणार या वृत्तानेच विकासकांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. यात काही बडय़ा विकासकांना विमानतळ स्थलांतरित होणार नाही याची खात्री आहे, पण छोटे विकासक विमानतळ, न्हावा शेवा सागरी पूल, जेएनपीटी, नैना क्षेत्रांची जाहिरात करीतच घरांची विक्री करीत आहेत. तिसरी मुंबई म्हणून या भागाला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे घरांचे दर या प्रकल्पांच्या बळावर वीस टक्क्य़ांनी वाढविले जात असल्याचे चित्र आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक विकासकांनी सवलतीच्या दरात घरे विकण्यास सुरुवात केली आहे. काही विकासकांनी सणासुदीच्या मुहूर्तावर बक्षिसांची खैरात करण्यास सुरू केली आहे. जमीन आणि बांधकामात गुंतवलेले पैसे वसूल व्हावेत आणि वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचे मासिक हप्ते चुकवता यावेत यासाठी काही विकासकांनी ४० टक्के सवलतीच्या दरात घर विकण्याची तयारी सुरू आहे.

नवी मुंबईत विमानतळाचा प्रस्ताव तयार करताना केवळ धावपट्टीचा विचार करण्यात आलेला नाही. त्याबरोबर आजूबाजूच्या विकासाचा आणि त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचाही विचार करण्यात आलेला आहे. मुंबईनंतर नवी मुंबई हे झपाटय़ाने वाढणारे औद्योगिक तसेच आर्थिक क्षेत्र आहे. त्यानुसार विमानतळ हा या विकासाचा केवळ एक भाग आहे. कल्याणला उतरून गुंतवणूकदार वा उद्योजक नवी मुंबईत येणार नाहीत. याशिवाय विमानतळाजवळ जेएनपीटी बंदर, न्हावा शेवा सागरी पूल, वसई, अलीबाग, दिल्ली, अलिबाग कॉरिडोअर यांसारखे अनेक प्रकल्प अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे हा विमानतळ रद्द वा स्थलांतरित करून चालणार नाही. तसे झाल्यास सरकारच्या या धोरणावर करण्यात आलेली आजूबाजूच्या गुंतवणूकदारांबरोबर हा धोका होणार आहे. सरकारने असा विचार न करता प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न हवेत.

– अशोक छाजर, विकासक, अरिहंत समूह.