बाजारातील पत टिकविण्यासाठी शेतमालाची विक्री

राज्यात यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने बाजार समितीत मोठय़ा प्रमाणात कांदा पाठविला जात असून उठाव नसल्याने कांदा उकिरडय़ावर फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे कांदा विक्री आता शेतकरी आणि व्यापारी या दोघांना परवडणे अशक्य होऊन बसली आहे. केवळ बाजारात पत टिकविण्यासाठी कांद्याची विक्री करावी लागत आहे, अशी हताश प्रतिक्रिया अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

यासाठी घाऊक बाजारातील व्यापारी कांदा विक्री करीत असून पुढील महिन्यात नवीन कांदा बाजारात येणार असल्याने आजची स्थिती अधिक बिकट होणार असल्याचे एकूणच चित्र आहे.

यंदा कांद्याचे अभूतपर्व उत्पन्न देशभरात झाले आहे. त्यात देशाला काही प्रमाणात कांदा पुरवठा करणाऱ्या राज्यातही कांद्याचे चांगलेच पिक आले आहे. त्यामुळे सर्वत्र कांदाच कांदा झाला असून शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा वांदा झाला आहे. मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरला शेतमाल पुरवठा करणाऱ्या तुर्भे येथील एपीएमसीच्या घाऊक बाजारात बुधवारी ११५ ट्रक टेम्पो भरुन कांदा आला असून कांद्याला उठाव नसल्याने तो काही दिवस ठेवून उकिरडय़ावर फेकून देण्याची वेल येत असल्याचे व्यापारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. चांगला कांदा चार दिवस व्यापारी गाळ्यात टिकून राहत असतो तर खराब कांद्याला दोन दिवसात पाणी सुटत असल्याने दुर्गधी सुटत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कांदा जागेवर शेतकरी एक दोन रुपयात विकत असून ते घाऊक बाजारात येईपर्यंत सहा ते सात रुपयांना पडत आहे. गाळ्याचे मासिक हप्ते, वाहुतक खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार यामुळे ह्य़ा भावात घाऊक बाजारात कांदा परवडत नाही पण गेली अनेक वर्षे शेतकऱ्याबरोबर असलले ऋणानुबंध आणि चांगली प्रतिमा राखण्यासाठी व्यापाऱ्यांना हा शेतमाल विकण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करावा लागत आहे. आणखी  एक ते दोन महिने ही तारेवरची कसरत करावी लागणार असून या सप्टेंबर महिन्यात नवीन कांदा बाजारात येणार असल्याने ही स्थिती अधिक बिकट होणार असल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले.