पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती
नवी मुंबई महानगरपालिकेत चार हजार ७१३ पदांची नव्याने भरती केली जाणार आहे. यात विभाग अधिकारी ते साहाय्यक आयुक्त पदांचा समावेश आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. सरकारची मंजुरी मिळताच पदे भरली जातील, अशी माहिती पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांची कामे विभाग कार्यालयातच असल्याने या कार्यालयाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे विचाराधीन आहे. सरकारची मंजुरी मिळताच कायमस्वरूपी पदे भरली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंढे यांनी आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी तीन महिन्यांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडला. प्रशासनातील शंभर टक्के कामे झाली नाहीत. प्रशासनातील कामे करीत असताना अडथळा निर्माण होत असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. या वेळी अमृत योजनेअंतर्गत सांडपाण्याचा वापर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नगरसेवक नवीन गवते यांच्या अपात्रतेबाबत लवकरच आदेश निघणार असल्याचे ते म्हणाले.
नेरुळ, बेलापूर आणि ऐरोली येथील रुग्णालयात साहित्य नाही, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही कमतरता आहे. रुग्णालयात साहित्य खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. त्यानंतर रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या भूखंडांवर अतिक्रमण होत असलेल्या ठिकाणी कुंपण टाकण्यात येणार आहे. याशिवाय ओला आणि सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाचे प्रमाण नवी मुंबईत वाढले आहे. १२० टन ओला कचरा व ६० टन सुका कचरा वेगळा करण्यात आला आहे. पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाशीत अत्यावश्यक पार्किंग म्हणून चारचाकी १०० रुपये आणि दुचाकीसाठी ५० रुपये आकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.