ठाणे-बेलापूर मार्गावर ऐरोली ते ‘मुकंद आयर्न’ कंपनीजवळ रिक्षाचालक प्रवाशांकडून अवाच्या सवा रक्कम आकारत आहेत. या मार्गावर काही दिवसांपासून शेअर रिक्षासाठी प्रत्येक प्रवाशामागे आठ रुपयांऐवजी दहा रुपये भाडे आकारले जात आहे. पेट्रोलची गेल्या काळात कोणतीही मोठी वाढ नसताना रिक्षाचालकांनी मनमानी सुरू केली आहे.
ऐरोली बस आगार ते ‘मुकंद आयर्न’ कंपनी, ऐरोली नाका, रेल्वे स्थानक, दिघा अशा चार टप्प्यांत शेअर पद्धतीवर रिक्षा धावतात. कळवा आणि विटावा परिसरातील नागरिक थेट ऐरोलीत येण्यासाठी पर्यायी मार्ग वापरतात. तर ऐरोलीतून दिघा, रामनगरकडे जाण्यासाठी प्रवासी रिक्षाचाच आधार घेतात. यात ‘माइंड स्पेस’ आणि ‘अक्षरा’ या कंपन्यांतील कर्मचारीही रिक्षाचा आधार घेतात. किमान भाडे ७ ते ८ रुपये असताना ऐरोली ते मुकंद या प्रवासाला सरसकट दहा रुपये आकारले जात आहेत.
याशिवाय नियमाप्रमाणे तीन प्रवाशांना रिक्षात बसण्यास परवानगी असताना चार ते पाच प्रवासी घेतले जात आहेत. रात्री दहानंतर शेअर रिक्षा नाकारत ‘मुकंद आयर्न’ आणि दिघा येथे जाण्यासाठी दुप्पट भाडे आकारत आहेत.

बेकायदा रिक्षा स्टॅँड
ऐरोली डेपो ते ‘मुकंद आयर्न’ या मार्गावर ऐरोली रेल्वे स्थानक वगळता भुयारी मार्गालगत राष्ट्रवादीच्या रिक्षा युनियनने पदपथावरच बेकायदा रिक्षा स्टँड उभा केला आहे. तर ‘माइंड स्पेस’ कंपनीजवळ शिवसेनेने पर्याय स्टँड थाटला आहे.