नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची यादी तयार; अतिरिक्त आयुक्तांचा निर्णय

शहरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध ठिकाणी नवरात्रोत्सवांच्या निमित्ताने रस्तयावर खड्डे खोदून मंडप उभारण्यात येत आहे. भर रस्त्यात मंडप उभारून कोंडी करणाऱ्या आणि शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या मंडळांना आता महापालिकेने परवानगीच न देण्याचा पवित्रा घेतला आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांची यादीच मागवली आहे.

उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गणेशोत्सव मंडळांना भर रस्त्यात खोदकाम करून कोंडी करण्यावर कारवाई करीत परवानगी नाकारली होती. त्यामुळे शहरातील अनेक उत्साहापोटी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मोठा धक्का दिला होता. गणेशोत्सव काळात अनेक मंडळांना परवानग्या नाकारण्यात आल्याने नवी मुंबईत अनेक गणेश मंडळांनी उत्सव साजरा केला नव्हता. आयुक्तांच्या या निर्णयाचे नगारिकांनीही स्वागत केले होते. त्यामुळे शहरातील राजकीय पुढाऱ्यांची फलकबाजी, रस्त्यावरील खोदकामामुळे   वाहतूक कोंडीला चाप बसला होता.

दोन दिवसांनी नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. यानिमित्त ऐरोली नाका, ऐरोली सेक्टर परिसर, नोसिल नाका, कोपरी गाव, तुभ्रे परिसर, वाशी, कोपरखरणे, नेरुळ आणि बेलापूर या ठिकाणी अनेक मंडळांनी रस्त्यांच्या दुतर्फा बांबू रोवून खड्डे खोदले आहेत. तर भर रस्त्यात मंडप, प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. त्यामुळे शहरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडीची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार आहे. काही मंडळांनी मंडप उभारण्यासाठी आवश्यक असेलली पालिका आणि अग्निशमन दलाची परवानगी घेतलेली नाही.

गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारचे खोदकाम व शहर विद्रुपीकरण होईल अशा प्रकारचे परवाने दिलेले नव्हते. शहरातील सर्व नवरात्रोत्सव मंडळांचे माहिती घेऊन महापालिका, अग्निशमन, पोलिसांची परवागनी यांची पडताळणी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करून उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येईल.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त