तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सत्ताधारी आणि विरोधक एकवटले
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते घणसोली येथील परिवहन विभागाच्या आगाराचा शुभारंभ करण्यास विरोध करणारे नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात आगामी सर्वसाधारण सभेत अविश्वासाचा ठराव आणण्याचा घाट रचला जात आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत राजकीय नेत्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या मुंढे यांना वेळीच आवरणे आवश्यक असल्याचे मत येथील सत्ताधारी व विरोधकांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे येत्या दहा-बारा दिवसांत होणारी ही सभा आयुक्तांची पहिलीच महासभा राहणार आहे.
नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) घणसोली येथील दुसऱ्या आगाराचे उद्घाटन १६ मे रोजी घेण्याचे प्रस्तावित होते. त्याची मंजुरी घेण्यास गेलेल्या परिवहन उपक्रमाच्या अधिकाऱ्यांकडे आयुक्तांनी नाईक यांच्या नावाला विरोध दर्शविला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संतापलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी येत्या सर्वसाधारण सभेत आयुक्त मुंडे यांच्यावर अविश्वास ठराव आणणार तयारी सुरु केली आहे.
पालिकेच्या कार्यक्रमांना किंवा उद्घाटनांना कोणाला बोलवायचे याचा सर्वस्वी अधिकार हा महापौरांचा आहे. तशी नियमावली तयार करण्यात आली असून राज्यातील पालिकांमध्ये हीच प्रथा कायम आहे.
महापौर शहरातील एखाद्या ज्येष्ठ नागरिकाच्या हस्तेदेखील उद्घाटन आटोपून घेऊ शकतात अशी या नियमावलीत तरतूद आहे. त्यामुळे मुंबई पालिकेच्या अनेक उद्घाटनांना शिवसेनेचे सत्ताबाहय़ नेते उपस्थित राहात असतात.
बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना पालिकेच्या कार्यक्रमांना बोलाविले जात नाही यावरून हा मुद्दा यापूर्वी चर्चिला गेला होता. त्या वेळी हेच कारण स्पष्ट करण्यात आले होते. आमदार म्हणून त्यांना त्यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमांना आमंत्रित करणे हे क्रमप्राप्त आहे, पण कोणाच्या हस्ते उद्घाटन किंवा शुभारंभ करावा याचे सर्वस्वी अधिकार हे महापौरांना महासभेने दिलेले आहेत. त्यात आयुक्तदेखील बदल करू शकत नाहीत. फार फार तर आयुक्त अशा कार्यक्रमांना गैरहजर राहू शकतात. यापूर्वी हा वाद मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यानंतर पालिकेच्या प्रशासन विभागाने ही नियमावली राजशिष्टाचार सांभाळणाऱ्या सामान्य प्रशासनाकडे पाठवून दिली होती.

पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चार दिवस पदभार स्वीकारलेल्या आयुक्तांवर अविश्वास ठराव आणणार, अशा विनाकारण कांडय़ा सोशल मीडियाद्वारे पिकविल्या जात आहेत. यामागे सत्ताधारी राष्ट्रवादी व आयुक्तांच्या संबंधात दुरावा निर्माण व्हावा हा उद्देश आहे. यामागे बेलापूर येथील एका लोकप्रतिनिधीचा वजनदार सुपुत्र व वाशी येथील एफएसआय नगरसेवक असल्याचा संशय आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. अविश्वास ठराव आणण्याचा सत्ताधारी पक्षाचा असा कोणताही विचार नाही
जयवंत सुतार, सभागृह नेता, नवी मुंबई पालिका