पाव भाजी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय ‘फास्ट फूड’ डिश आहे. यात भाज्यांपासून बनविलेली करी त्यात चवीसाठी पेरलेले बटर. बटर लावूनच हलकेसे भाजलेले पाव आणि सोबत कांदा-लिंबूची भर चवीत भर टाकतात. अशा पावभाजीचा दर्जा राखून खवय्यांची सेवा करण्याचे गेली कित्येक वर्षे ऐरोली सेक्टर-३ मधील साईप्रकाश हॉटेल केली जात आहे.

नीलया आचार्य या दक्षिण भारतातील मंगरूळ परिसरातील तरुणाने १९७६ साली मुंबई गाठली. आठवीचे जेमतेम शिक्षण असल्याने काही दिवस इंटिरिअरच्या हाताखाली काम केले. कामात जम बसल्यानंतर १९९२ साली स्वत:चा इंटिरिअरचा व्यवसाय सुरू केला. हॉटेलच्या इंटिरिअर डेकोरेशनची कामे मोठय़ा प्रमाणात मिळत असत. त्यामुळे हॉटेलचा व्यवसाय असावा, अशी इच्छा मनात बाळगून त्याने ऐरोलीत १९९२ साली सेक्टर-३ स्थानकाजवळील परिसरात शिवप्रकाश नावाचे छोटे हॉटेल थाटले. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून यात वाढ करण्यात आली.

साईप्रकाशची पावभाजी ही ऐरोलीची शान म्हणून ओळखली जाते. पावभाजीचा दर्जा राखण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रमोद आचार्य यांनी सांगितले. दर्जा उत्तम राखण्यासाठी उत्तम वस्तू वापरल्या जातात. प्रशिक्षित चार बल्लवाचार्य (कुक) पावभाजी बनविण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार पावभाजी बनवली जाते. यासाठी रोज दहा किलो अमूल बटर वापरले जाते. बटाटे, काश्मिरी मिरची, लसूण-आल्याची पेस्ट, धने पावडर, पावभाजी मसाला वापरून ती बनवली जाते. टोमॅटो, वाटाणे आणि कांदा वापरून पावभाजी बनवली जाते. ऐरोली परिसरात शाळा-महाविद्यालयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. स्थानक आणि आगार याच परिसरात आहेत. त्यामुळे खवय्यांची गर्दी असते. ऑर्डरनुसार होम डिलिव्हरीची सोयही करण्यात आलेली आहे. गेल्या २० वर्षांपासून पावभाजीचा दर्जा राखण्याचे काम साईप्रकाशने केले आहे. माफक किमतीत सर्व वर्गातील ग्राहकांच्या पसंतीस ही पावभाजी पूर्णपणे उतरली आहे.

साईप्रकाश

  • राजकमल बिल्डिंग, ऐरोली स्थानकाजवळ, बस आगारासमोर सेक्टर-३ ऐरोली.
  • वेळ- सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत.