उपविभागीय अधिकाऱ्यांच्या परवानगीचे पावती पुस्तक ठेकेदाराकडे

तळोजा गावालगत गेल्या आठवडय़ात नवी मुंबई वाहतूक पोलीस आणि पनवेलच्या तहसीलदारांनी वाळूच्या ३२ ट्रकवर केलेल्या कारवाईची पाळेमुळे कल्याण महसूल विभागात असल्याचे स्पष्ट झाले आहे. कल्याण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या परवानगीने ही वाहतूक केल्याची पावती ट्रकचालकांनी कारवाईनंतर दोन तासांनी दाखविली होती. वाळू वाहतुकीचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या परवानगीचे पावती पुस्तक एका ठेकेदाराकडे असल्याने त्यानेच पोलिसांच्या कारवाईनंतर ट्रकचालकांना पावत्या वाटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तळोजा गाव ते खारघरदरम्यान वाळूने भरलेले ट्रक रोज काळोखात उभे केले जातात आणि पहाटे ते रिकामे केले जातात, अशी माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त नितीन पवार यांना मिळाली होती. त्यांनी गेल्या गुरुवारी मध्यरात्री स्थानिक पोलिसांना सुगावा लागू न देता सापळा रचला आणि शुक्रवारी पहाटे ३२ ट्रक जप्त केले. वाळू कुठून आणली, वाहतुकीची पावती दाखवा, अशी विचारणा केल्यावर ट्रकचालकांनी सुरुवातीला सारवासारव केली आणि एका तासाने कल्याण उपविभागीय अधिकाऱ्यांनी वाळू वाहतूक करण्याची परवानगी दिल्याची पावती दाखविली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी व पनवेलच्या महसूल विभागाने या पावतीचा पाठपुरावा केल्यानंतर कल्याण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या परवानगीचे पावती पुस्तक गेली २० वर्षे खासगी व्यक्तीच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले. खारघर पोलीस ठाण्यात ट्रकमालकांवर आणि वाळूची पावती देणारा ताहिब अब्दुल तानकी आणि कल्याण येथील वाळूच्या ठेकेदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी ११६ ब्रास वाळू जप्त केली असून जप्त केलेले ट्रक १५ जूनपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. ही वाळू ट्रकचालकांनी कुठून आणली तिचा उपसा कोणत्या खाडीतून झाला, याचा शोध अद्याप लागलेला नाही.

महसूलमंत्र्यांकडून प्रशंसा

राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवी मुंबई वाहतूक पोलीस आणि पनवेलचे तहसीलदार यांचे दूरध्वनीवरून संपर्क साधून कौतुक केले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच कोणताही राजकीय दबाव सहन करू नका असे सांगत, बेकायदा कृत्य करणाऱ्यांविरोधात थेट कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल

कल्याण उपविभागीय अधिकाऱ्यांनी नवी मुंबई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तळोजा येथील ट्रकचालकांना वाळूच्या रॉयल्टीची पावती देण्यात लोकसेवकांचा कोणताही सहभाग नाही, मात्र कल्याण उपविभागीय अधिकाऱ्यांनी लिलावातील वाळूच्या वाहतुकीसाठी पावतीवाटपाचे अधिकार ठेकेदाराला दिल्याचे स्पष्ट होत आहे. ताहिब हा ठेकेदाराचा कर्मचारी आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात प्रति ट्रक साडेतीन हजार रुपये घेऊन या पावत्या वाटल्याचे म्हटले आहे. कल्याणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी ८ जूनला काढलेल्या आदेशामध्ये वाळूची वाहतूक सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी करावी, असे स्पष्ट नमूद असतानाही ताहिबने वाटप केलेल्या पावत्यांवर रात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंतची वेळ आहे. त्यामुळे सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.