ठेकेदाराकडून पालकांवर पैसे देण्यासाठी दबाव; प्रशासन अनभिज्ञ

विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या शिक्षण साहित्य अनुदानाची नवी मुंबईतील पालिका शाळांतून बेकायदा वसुली सुरू असल्याची अनेक पालकांची तक्रार आहे. ठेकेदाराने गतवर्षी तयार करून ठेवलेले शैक्षणिक साहित्य वाया जाऊ नये म्हणून गेल्या शैक्षणिक वर्षांच्या अखेरीस या साहित्याचे बेकायदा वाटप करण्यात आले होते. आता अनुदानाच्या रकमेची विद्यार्थ्यांकडून बेकायदा वसुली सुरू असल्याचा पालकांचा आरोप आहे.

शैक्षणिक साहित्य वाटपाचा दोन वर्षांचा ठेका आपल्यालाच मिळेल या आशेने ठेकेदाराने कोटय़वधी रुपयांचे गणवेश व शैक्षणिक साहित्य बनवून ठेवले होते. त्यानंतर खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या चर्चेने व कारवाईच्या टांगत्या तलावरीमुळे ठेकेदाराने ठेक्यातूनच माघार घेतली. त्यातच शासनाने शैक्षणिक साहित्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा अध्यादेश ५ डिसेंबर २०१६ रोजी काढला. त्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षांच्या अखरेरीस विद्यार्थ्यांना तयार गणवेश व साहित्याचे बेकायदा वाटप करण्यात आले.

शिक्षण विभागाने जुलै महिन्यात १७,९६८ विद्यर्थ्यांच्या बँक खात्यात गणवेश व साहित्याचे पैसे जमा केले. आता ठेकेदाराने पैशांची बेकायदा वसुली सुरू केली आहे. पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनीही याबाबत मौन साधल्याने या प्रकारात कोणाचे हात ओले झाले आहेत, याची चौकशी आयुक्तांनी करावी, अशी मागणी सानपाडय़ाचे सुरेश मढवी यांनी लेखी पत्राद्वारे करण्यात केली आहे. शिक्षण विभागाला याबाबत काहीच कल्पना नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

गतवर्षी ठेकेदाराच्या माणसांनी पालकांची भेट घेऊन तुम्हाला आता मोफत गणवेश व साहित्य देतो. खात्यात पैसे जमा झाल्यानंतर ते परत द्या, असे सांगत होती, अशी माहिती काही पालकांनी दिली. शाळांमध्ये टेम्पो भरून साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले, परंतु त्याची कोणीच वाच्यता झाली नाही, त्यामुळे हा सर्वप्रकार कोणाकोणाच्या संगनमताने झाला असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकीकडे शालेय गणवेश वाटपाच्या ठेक्यावरून खंडणी प्रकरण समोर आले असताना दुसरीकडे शाळेमध्ये बेकायदा गणवेश व साहित्य वाटप आणि वसुलीचा प्रकार समोर आला आहे.

गेल्या वर्षी शाळाशाळांमध्ये गणवेश व शैक्षणिक साहित्य कोणी वाटले असेल तर ते योग्य नाही. पालिकेने मुलांच्या खात्यात पैसे वर्ग केल्यानंतर शाळांमध्ये कोणी पैसे मागण्यासाठी येत असेल तर हा प्रकार गंभीर असून याबाबत माहिती घेण्यात येईल.

संदीप संगवे शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महापालिका

पालिका शाळांमध्ये गेल्या वर्षी बेकायदा शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप झाले होते. त्याचे पैसे वसूल करण्यासाठी संबंधितांची माणसे शाळेत येत आहेत. हा सर्व प्रकार एका शाळेत गेल्यावर समोर आला. साहित्य वाटप आणि अनुदान वसुली सुरू असताना पालिका प्रशासनाने काय केले? पालिकेच्या हलगर्जीपणाची आयुक्तांनी योग्य ती चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी. सर्वच प्रकियेत मोठा गैरव्यवहार लपला आहे.

सुरेश मढवी, तक्रारदार, सानपाडा