गाळेधारकांच्या संख्येत वाढ
भंगारमाफिया म्हणून ओळख असणाऱ्या मुख्तार अन्सारी याने ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा परिसरात राजकीय नेत्यांच्या फलकांचा आधार घेत पदपथावर अतिक्रमण केले आहे. पदपथावर गाळेधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त त्यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
संजय गांधीनगर परिसरात अन्सारीने रस्त्यालगत हॉटेल आणि जनसंपर्क कार्यालय थाटले आहे. रस्त्यालगत असणाऱ्या दुकानांवर अन्सारी यांचा वरदहस्त असल्याने लाकडी वखार, मटण विक्रेते इतर व्यावसायिकांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांसाठी पदपथ उरलेला नाही. त्यातच वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. सायंकाळी या परिसरात अनेक कार्यकर्त्यांची वाहने कार्यालयाबाहेर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून उभी केलेली असतात. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याबाबत तक्रारी करूनही पालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे.