ज्येष्ठ नागरिकांचे परिवहन सेवेला पत्र
उरणमधून नवी मुंबई तसेच मुंबई गाठण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटी बससेवेचा दररोज हजारो प्रवासी लाभ घेतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय असून एनएमएमटी व्यवस्थापनाकडून उरणमधील ज्येष्ठ नागरिकांनाही सवलतीचा पास दिला जातो. मात्र हा पास काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तुर्भे आगारात जावे लागत असल्याने एनएमएमटीने ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी पासची व्यवस्था उरणमध्येच करावी, अशी मागणी उरणच्या ज्येष्ठ नागरिक मंडळाने एनएमएमटी परिवहन सेवेच्या सभापतींकडे लेखी स्वरूपात केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटी बस सेवेच्या ३०, ३१ व ३९ या क्रमांकाच्या बस उरणमधील प्रवाशांसाठी उपयुक्त ठरू लागल्या आहेत. एनएमएमटीने ही सेवा सुरू केल्याने नवी मुंबईतील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ झाला आहे. त्याचप्रमाणे उरणमधील ज्येष्ठ नागरिकांना बससेवेकडून दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या दरातील पासमुळे प्रवास करणे फायद्याचे झाले आहे. मात्र या पासची मुदत वाढविण्यासाठी विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना तुर्भे, वाशी तसेच बेलापूर येथे जावे लागते.
सध्या उरणच्या पेन्शनर्स पार्क येथे एनएमएमटीचे वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेले आहे. या कक्षाला वीजपुरवठा नसल्याने तेथे पासची सुविधा उपलब्ध करता येत नसल्याचे सांगण्यात येत असल्याचे उरण ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश काटदरे यांनी सांगितले.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एनएमएमटी परिवहन सेवा विभागाने उरण नगरपालिका व वीज वितरण कंपनीला पत्र दिल्यास सोय होऊ शकते, त्यामुळे तसे पत्र मिळावे अशी विनंती निवेदनाद्वारे मंडळाने साबू डॅनिअल यांच्याकडे केली आहे. उरण नियंत्रण कक्षात वीज नसल्याने येथील नियंत्रकांनाही काळोखात काम करावे लागत असल्याने परिवहन विभागाने तातडीने विजेच्या जोडणीसह संगणक यंत्रणा बसवून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.