नवीन पनवेल येथील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी महागाईवर उतारा म्हणून ऐन दिवाळीत सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरातील किराणा मालविक्रीचे केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातील वस्तू मॉलपेक्षा स्वस्त असल्याचा दावा संघातील सदस्यांनी केला आहे.

या ज्येष्ठ नागरिक संघाचे शंभर सदस्य आहेत. या संघातर्फे नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. सध्याची महागाई पहाता ना नफा, ना तोटा या तत्त्वावर असे एखादे केंद्र सुरू करण्याची कल्पना या ज्येष्ठांनी मांडली. त्यानुसार पनवेल रेल्वे स्थानकाच्या नवीन पनवेलकडील परिसरात हे केंद्र सुरू झाले. या केंद्रात साखरेपासून रवा, मैदा, पिठी साखर, शेंगदाणे तसेच दिवाळी फराळ बनविण्यासाठी लागणारा किराणा माल या उपलब्ध आहे. पनवेलच्या घाऊक बाजारातून किराणा माल विकत घेऊन तो येथे विक्रीसाठी ठेवला आहे. हा माल बाजारभावापेक्षा खूपच स्वस्त आहे. अन्य दुकानांत २५० रुपये किलो असणारे खोब्रे या केंद्रात १९० रुपये किलोने मिळत आहे, तर शेंगदाणे १०० रुपये, रवा ३२ रुपये आणि मैदा २५ रुपये किलोने उपलब्ध आहे. सर्वसामान्यांच्या समाधानात आपले समाधान शोधणारे हे ज्येष्ठ नागरिक येथे जातीने व उत्साहाने उभे राहून सेवा देत आहेत. या केंद्रात सुमारे एक लाख रुपयांचा माल भरला असून त्यातील निम्मा माल संपलाही आहे, हे केंद्र दिवाळीपर्यंत सुरू ठेवण्यात येईल, अशी माहिती संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी दिली.