प्लास्टर ऑफ पॅरीसऐवजी शाडू वा मातीच्या मूर्तीना मागणी; निर्माल्यातून खतनिर्मितीवर भर

गणेशोत्सवात होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी मातीच्या वा शाडूच्या मूर्ती तयार करण्यावर भर दिला जात आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) आणि थर्माकोलचा वापर टाळण्यासाठी जगजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. उत्सवात वापरण्यात येणारी फुले आणि पुजेचे इतर साहित्य उघडय़ावर वा कचऱ्यात फेकून न देता निर्माल्य कलशात टाकावे आणि त्यापासून खत निर्मिती करण्यात यावी, असा उद्देश आहे. यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. यात आता समाजमाध्यमस्नेही तरुणांनी पुढाकार घेतला आहे. शाडू वा मातीच्या सुबक गणेशमूर्तीची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांत शाडू वा मातीच्या मूर्तीऐवजी स्वस्त आणि हलक्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे या सणाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. त्यामुळे राज्याच्या पर्यावरण विभागाकडूनही विविध प्रकाराच्या स्पर्धा भरवून जनजागृती केली जात आहे. शाडूच्या गणेशमूर्ती बनविणारे अनेक कारखाने कलाकारांची कमतरता व मजुरांची वाढती मजुरी तसेच दरवर्षी होणारी माती तसेच रंगाची दरवाढ यामुळे घटली. तर दुसरीकडे प्लास्टरच्या एका साच्यातून दिवसाला दहा ते पंधरा मूर्ती तयार होत असल्याने अधिक फायदा होऊ लागल्याने अनेक कारखानदारांनी याच मार्गाकडे वळले आहेत.

यात सध्या बदल घडून अनेक गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांतून महागडय़ा असल्या तरी शाडूच्याच मातीच्या मूर्तीची मागणी वाढू लागली आहे. जासई येथील चार पिढय़ांपासून काम करणाऱ्या पवार कुटुंबाच्या मयूर आर्ट या कारखान्यात, तर अनेक तरुणांकडून सोशल मीडियावरील गणेशमूर्ती थेट व्हॉट्स अ‍ॅपवरून पाठविल्या जात असल्याची माहिती मनोहर पवार या कलाकाराने दिली. तसेच फोटो घेऊन येत भारतीय कला, कोळी, बालगणेश, एकाच वस्तूची प्रतिकृती असलेल्या मूर्ती तयार करण्याची मागणी केली जात आहे. अनेकांकडून वर्षांनुवर्षे प्लास्टरच्या मूर्ती नेल्या जात होत्या. त्यांच्याकडून त्याच रूपातील मूर्ती शाडू वा मातीपासून तयार करून मागितल्या जात आहेत. शाडूच्या मातीचे काम करताना कलाकार म्हणून अधिक आनंद होत असल्याचे अनेक जणांनी सांगितले. त्यामुळे जास्तीत जास्त भर शाडू वा मातीच्या मूर्तीवरच दिला जात असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

अशा प्रकारे हाताने तयार करण्यात येणाऱ्या मातीच्या मूर्ती या वजनाने हलक्या असल्याने आणि पाण्यात विरघळतात. त्यामुळे पर्यावरणाचेही रक्षण होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अशा प्रकारच्या शाडू मातीच्या गणेशमूर्तीच्या मागणीत वाढ झाल्याने केवळ पर्यावरणाचे संरक्षण होणार नाही, तर कलेचा वारसा जपू पाहणाऱ्या कलावंतां मध्येही वाढ होण्यास मदत होणार आहे.