पहिल्याच महापालिका निवडणुकीत भाजप विरोधात महाआघाडी असा संघर्ष

शहरी आणि ग्रामीण अशी रचना असलेल्या पनवेल महानगरपालिकेत शहरी भागाचे वर्चस्व असल्याने पुढील महिन्यात होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत सत्ता संपादनसाठी भाजपने प्रयत्न चालवले आहेत. युतीबाबतचा अद्याप निर्णय झालेला नसल्याने शिवसेनेचे अजून तळ्यातमळ्यात आहे. तर शेकापने महाआघाडीच्या माध्यमातून भाजपला आव्हान देण्याची सारी तयारी केली आहे.

कोकणात भाजपचा पाया तसा कच्चा. रायगडमध्ये पनवेलचा अपवाद वगळता एकही आमदार निवडून आला नव्हता. शेकाप, काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास करणारे रामशेठ आणि प्रशांत ठाकूर पिता-पुत्रांनी पनवेलवर आपली पकड अधिक घट्ट करण्याकरिता सारी ताकद पणाला लावली आहे. राज्यात भाजप सत्तेत आल्यावर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आलेली पनवेल ही एकमेव महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेत कोणता परिसर समाविष्ट करावा यावरून बराच वाद झाला. प्रकरण न्यायालयात गेले. ६५ टक्के शहरी तर ३५ टक्केग्रामीण भागाचा पनवेल महानगरपालिकेत समावेश आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकूर विरुद्ध शेकापचे विवेक पाटील यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

सुमारे सव्वाचार लाख मतदार असलेल्या या महापालिकेत २०  प्रभागांमधून ७८ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. शेकापने २९ गावांमधील आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचार केला असून महाआघाडीमधील काँग्रेस पक्षाने ७८ पैकी ४० जागांची मागणी सुरुवातीला केली. मात्र महाआघाडीत फूट नको यासाठी घुमजाव करत भाजपचा पराभव हीच आपली भूमिका सांगत काँग्रेसने मिळेल तेवढय़ा जागांवर लढण्याचा विचार पक्का केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मुलीला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बसण्याची संधी शेकापने दिल्यामुळे पदरात पडेल तितक्या जागेवर धन्यता मानण्यात राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी तयार असल्यामुळे सध्यातरी महाआघाडीमध्ये कोणतीही मतांतरे समोर येत नाहीत. माजी आमदार विवेक पाटील यांच्या देखरेखीखाली महाआघाडीची तयारी सुरू आहे. २०१४ साली माजी आमदार पाटील यांच्या झालेल्या पराभवानंतर पनवेलकडे पाटील यांनी लक्ष केंद्रित करून तीन राजकीय पक्षांच्या महाआघाडीला जन्म दिला. त्यानंतर बँकेच्या निवडणुका, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती, कोकण शिक्षक मतदार संघ, रायगड जिल्हा परिषद निवडणूक अशांवर महाआघाडीने यश मिळवले. याच महाआघाडीने नुकतेच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या गावातील गव्हाण ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवल्यामुळे महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास बळावला आहे.

युतीसाठी प्रयत्न

’भाजपने जिल्हा परिषदेतील पराभवानंतर पनवेलची निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्या लाटेचा लाभ करून घेण्याचा विचार पुढे करत गरजेपोटी वाढविलेल्या माथाडी कामगारांच्या घरांना नियमित करण्यासारखे प्रश्न हातात घेतले आहेत.

’भाजपने सेनेची साथ मिळाल्यास पालिकेच्या सत्ता पटलावरील ४० सदस्यांच्या जादूच्या आकडय़ापर्यंत मजल मारता येईल म्हणून अनेकदा सेनेकडे टाळीसाठी हात पुढे केला. मात्र भाजपची ही खेळी अद्याप तरी चालली नाही.

’सेनेला देऊ केलेल्या २० जागांवर केंद्रीय मंत्री अनंत गीते हे समाधानी असून त्यांनी एका कागदावर युतीच्या जागांच्या केलेल्या वाटपाचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावला.

’सेनेतील माजी पदाधिकाऱ्यांना आदेश बांदेकर यांचे नेतृत्व मान्य नसल्यामुळे निवडणुकीत सेनाप्रमुखांचा आदेश नसला तरी स्थानिक सैनिकांची मोट भाजपशी बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सेनेने ठाणे पॅटर्न पनवेलमध्ये कायम ठेवण्याचा मनसुबा पुढे करत मंत्री एकनाथ शिंदे व आदेश बांदेकर यांच्या हातामध्ये सेनेच्या प्रचाराची सूत्रे दिली आहेत. सेनेकडे १८० इच्छुकांचे अर्ज आले आहेत.

’भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनेवलच्या विकासासाठी केलेल्या कामांच्या आधारे मतदारांसमोर जाण्याचे ठरविले आहे.

’पनवेल पालिकेवरील सत्तेसाठी ही लढाई असली तरी ठाकूर विरुद्ध पाटील अशा दोन व्यक्तिमत्त्वांच्या अस्तित्वाची व २०१९ सालच्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या लढाईकडे पाहिले जात आहे.