आदेश बांदेकर यांचे वक्तव्य

शिवसेनेत गटतट नसून शिवसेनेचा कारभार फक्त शिस्तीने व ‘आदेशा’वरूनच चालतो, असे वक्तव्य शिवसेनेचे सचिव बांदेकर यांनी केले. पनवेल महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावरच लढवणार, अशी चिन्हे दिसू लागताच खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या कामांची यादी प्रसिद्ध करून प्रचाराचा नारळ फोडला. त्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बांदेकर बोलत होते.

युतीवरून सुरू असलेल्या वादाबाबत केंद्रीय मंत्री अनंत गीते व सेना सचिव आदेश बांदेकर असे दोन गट पडले आहेत का, असे विचारले असता शिवसेनेत गटतट नसल्याचे बांदेकर यांनी स्पष्ट केले. खासदार बारणे यांनी कामांचा आढावा घेतला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, शेतकरी कर्जमुक्ती, शहिदांना आर्थिक सहकार्य, अमेरिकेमधील भारतीयांवरील हल्ले, मतदाराला मतदानानंतर स्लिप देणे, शेतकऱ्यांना २४ तास वीज, केंद्रीय विद्यालयांची संख्या वाढवणे, पुणे लोणावळा रेल्वेचा तिसरा ट्रॅक, नेरळ माथेरान लोहमार्गावर नवीन डबे, कर्जत-पनवेल लोहमार्गावर भिगारवाडी स्थानक उभारावे या कामांसाठी पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.