विशिष्ट नगरसेवकांचा आयुक्तांना विरोध असल्याचा दावा; मुंढेसमर्थक मोठय़ा गटाची पालकमंत्र्यांकडे तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत अप्रत्यक्ष संधान बांधून नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या शिवसेनेतील काही नेत्यांच्या डावपेचामुळे आता या पक्षातच दुफळी निर्माण झाली आहे. मुंढे यांच्या शिस्तप्रिय आणि पारदर्शी कारभारामुळे नवी मुंबई महापालिकेतील नाईक कुटुंबांचा हस्तक्षेप कमी झाला असून त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे, अशी भावना सेनेतील काही ज्येष्ठ नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. या पाश्र्वभूमीवर या मोठय़ा गटाने गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांची भेट घेत सेनेने मुंढे यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका मांडल्याचे समजते.

राजरोसपणे बेकायदा बांधकामे करणाऱ्या आणि वर ज्येष्ठ असल्याची फुशारकी मारत फिरणाऱ्या बडय़ा पदाधिकाऱ्यांना नोटिसा धाडत मुंढे यांनी जरब निर्माण केली आहे. महापालिकेचे आयुक्तपद भूषविलेल्या आणि आता राजकीय नेत्याच्या भूमिकेत शिरलेल्या एका माजी सनदी अधिकाऱ्याच्या काळातील वादग्रस्त प्रस्तावांची चौकशी सुरू करण्याची तयारीही मुंढे यांनी चालवली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सर्वपक्षीय राजकीय नेते व नगरसेवकांनी मुंढे यांना चित करण्याची खेळी चालवली आहे.

सुरुवातीला मुंढे यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या शिवसेनेतील काही नेत्यांनीच आता त्यांच्याविरोधात रणशिंग पुकारले आहे. शिवसेनेचे चार पदाधिकारी, काँग्रेसचे काही नेते आणि राष्ट्रवादीतील गणेश नाईक यांना मानणारे कट्टर नगरसेवकांनी एकत्र येत मुंढे यांच्याविरोधात व्यूहरचना आखली आहे. परंतु, शिवसेनेतच यामुळे कमालीची अस्वस्थता पसरली आहे. सेनेतील एका मोठय़ा गटाने मुंढे यांना पाठिंबा असल्याचे एक निवेदन पक्षाचे जिल्ह्यतील नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केले आहे. मुंढे यांना पाठिंबा देणाऱ्या या नगरसेवकांचे नेतृत्व ऐरोलीतील शिवसेनेचा एक मोठा नेता करत असून त्याच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या २० पेक्षा अधिक नगरसेवकांनी शुक्रवारी पालकमंत्र्यांची भेट घेतली. मुंढे यांच्याविरोधी भूमिका घेणे राजकीयदृष्टय़ा परवडणारे नसून शहरातील सुजाण नागरिकांचा मोठा वर्ग त्यामुळे पक्षाविरोधात जाईल, असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची दादागिरी मुंढे यांनी थांबवली असून अशा वेळी त्याच नेत्यांनी निर्माण केलेल्या जाळ्यात शिवसेना फसत आहे, असा मुद्दाही मांडण्यात आल्याचे समजते. पालकमंत्री शिंदे यांनी या नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेत रविवारी यासंबंधी एक बैठक बोलाविल्याचे सांगण्यात येते.

मुंढे यांच्यावरील नाराजीची कारणे..

नवी मुंबई महापालिकेत आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर मुंढे यांनी येथील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. कोटय़वधी रुपये किमतीच्या काही वादग्रस्त प्रस्तावांनाही त्यांनी केराची टोपली दाखवली असून बेकायदा बांधकामे, पदपथ अडवून बसणारे फेरीवाले यांनाही या काळात काही प्रमाणात अटकाव बसला आहे. आपल्या बेधडक वागण्यामुळे मुंढे लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याचे चित्र वारंवार निर्माण झाल्याने शहरातील जवळपास सर्वच राजकीय नेत्यांना त्यांची कार्यपद्धती पसंत नाही. ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या घुमटावर संगमरवरी अच्छादन बसविण्याच्या सुमारे १९ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मुंढे यांनी विरोध केल्याने महापालिकेतील एक बडा पदाधिकारी कमालीचा अस्वस्थ झाला आहे. मोरबे धरण परिसरात जलविद्युत प्रकल्प राबविण्याचा असाच कोटय़वधी रुपयांचा प्रकल्प अनावश्यक खर्चाचा मुद्दा पुढे करत आयुक्तांनी स्थगित ठेवला आहे. या कारणांमुळे मुंढे यांना राजकीय विरोध होत आहे.