विद्यमान मुख्य शहर अभियंत्याच्या निवृत्तीमुळे अडचण

विमानतळ, मेट्रो आणि नेरुळ उरण रेल्वेसारखे बडे प्रकल्प प्रगतिपथावर असताना सिडकोत एका मुख्य शहर अभियंत्याची जागा महिना अखेर रिकामी होणार आहे. विद्यमान मुख्य शहर अभियंता संजय चौधरी या महिन्यात सेवानिवृत्त होणार असून त्यांनी मुदतवाढ घेण्यास नकार दिल्याने सिडकोतील अभियंत्यामधूनच आता या पदाची निवड केली जाणार आहे. त्यासाठी दीर्घ अनुभव हा निष्कर्ष आहे.

मार्च १९७० रोजी स्थापन झालेल्या सिडकोतील अनेक अधिकारी, अभियंता आता निवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे २२०० कर्मचारी अधिकाऱ्यांची मंजुरी असलेल्या सिडकोत आता केवळ १३०० कर्मचारी अधिकारी शिल्लक आहेत. यातील अनेक अधिकारी अभियंते या वर्षांअखेर निवृत्त होणार आहेत. त्यामुळे मेट्रो, नेरुळ व उरण सारख्या खर्चीक प्रकल्पांचा खर्च सिडको करीत असून विमानतळावर दोन हजार कोटी रुपयांची कामे सध्या सुरू असताना दीर्घ अनुभव असलेल्या अभियंत्याची नियुक्ती करताना सिडकोला अडचण येणार आहे.

नियुक्तीशिवाय पर्याय नाही

सिडकोत इतर दोन मुख्य अभियंता असून त्यांच्यावर मेट्रो व रेल्वेची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, तर डिसेंबर २०१९ पर्यंत नवी मुंबई विमानतळावरील पहिल्या टप्प्यात टेक ऑफ व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकार आग्रही आहे. त्यामुळे या प्रकल्पांसाठी नवीन मुख्य अभियंत्याच्या नियुक्तीशिवाय सिडकोपुढे कोणताही पर्याय नाही.

संजय चौधरींची कामगिरी

विमानतळातील स्थापत्य कामांची जबाबदारी मुख्य अभियंता संजय चौधरी यांच्यावर होती. त्यांनी यापूर्वी खारघर येथील गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, हेटवणे, बाळगंगा, कोंढाणे धरण, शहरातील सर्व पाणीपुरवठा सेवा यासारख्या मोठय़ा प्रकल्पांवर काम केले आहे. नवीन वर्षांत येथील १५ हजार कोटी रुपये खर्चाच्या कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.