नवी मुंबई क्षेपणभूमीवर प्रक्रियेसाठी जाणाऱ्या दैनंदिन घनकचऱ्यापासून पालिकेला वर्षांला २६ कोटी रुपये उत्पन्न मिळू शकतील, असा अंदाज पालिकेने अर्थसंकल्पात स्पष्ट केलेला असताना स्थायी समितीने घनकचऱ्यापासून पालिकेला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही, असे नमूद केल्याने यात काही तरी गौडबंगाल असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी सभागृहात केला. घनकचरा व्यवस्थापातून उत्पन्न मिळण्याऐवजी पालिका दरवर्षी या सेवेवर १४३ कोटी रुपये या सेवेवर खर्च करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रातून दररोज ६०० मेट्रिक टन घनकचरा निर्माण होत आहे. हा कचरा तुर्भे येथील क्षेपणभूमीवर शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी पाठविला जातो. त्यात आता सुका व ओला कचरा वर्गीकरण करून कचरा क्षेपणभूमीवर पाठविला जात आहे. साफसफाई आणि कचरा वाहतुकीवर पालिकेचे दर वर्षी कोटय़वधी रुपये खर्च होतात. टाकाऊपासून टिकाऊ निर्माण करण्याच्या उद्देशाने पालिका घनकचऱ्यापासून खत, वीज, आणि इंधननिर्मितीचे प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. घनकचऱ्यातून येणाऱ्या प्लास्टिकवर प्रक्रिया करून इंधन निर्मिती केली जाते. यातून निर्माण होणारी राख बांधकामासाठी लागणाऱ्या विटा बनविण्यास उपयोगी पडत असल्याने या राखेला मागणी आहे. पाालिका क्षेत्रातील या घनकचऱ्यापासून तोटा होण्यापेक्षा वर्षांला २६ कोटी ८९ लाख ३५ हजार रुपये उत्पन्न मिळाले असे, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अंदाजपत्रकात स्पष्ट केले आहे. त्याला स्थायी समितीने आक्षेप घेतला असून या सेवेतून एक छदाम पालिकेला मिळणार नाही असे नमूद केले आहे. त्यामुळे यात गौडबंगाल असून त्याची चौकशी करण्याची मागणी पाटकर यांनी केली आहे.

पालिका घनकचरा व्यवस्थापनावर दरवर्षी १४३ कोटी रुपये खर्च करीत असून त्याबदल्यात एक रुपया उत्पन्न मिळत नाही. घनकचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या कंत्राटदारांच्या कृपाशीर्वादामुळे स्थायी समितीच्या सदस्यांनी या सेवेतून एक रुपया मिळणार नाही, असे मत नोंदविले आहे. त्यामुळे घनकचऱ्यापासून तयार होणाऱ्या इंधनापासून पालिकेला गेल्या काही वर्षांत किती उत्पन्न मिळाले, त्याचा लेखा जोखा जनतेसमोर मांडण्याचे आवाहन पाटकर यांनी केले आहे.

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वी कचराफेक

पालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सिडको प्रशासन व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाशेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत पाहणी करून प्रकल्प सुरू करायचा की नाही, हे ठरवू, असे सूतोवाच केल्यानंतर सिडकोने गुरुवारी थेट कचरा टाकण्याचे काम सुरू केले. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा सिडकोची कचरा वाहून नेणारी वाहने रोखून विरोध केला. त्यामुळे पुन्हा सिडकोच्या घनकचरा व्यवस्थापनाचे काम ठप्प झाले.

आयुक्त अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेऊन आदेश देतात मात्र त्या आदेशाविरोधात सिडकोचे अधिकारी वागतात त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर विश्वास कसा ठेवावा असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी विचारला आहे. ग्रामस्थांच्या या विरोधाच्या भूमिकेमुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचे व्यवस्थापन वहाळ येथेच करावे लागणार आहे.  पनवेलमधील सर्व कचरा येथे जमा होत होता.