थंडीवर भवितव्य अवलंबून ’ घाऊक बाजारात तांदूळ पाच रुपयांनी वाढला
सरकारने जप्त केलेली लाखो टन डाळ काही ठिकाणी शंभर रुपयांत मिळत असली तरी संक्रातीपर्यंत तूर डाळीचे दर उतरण्याची शक्यता कमी असल्याचे घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सोलापूर व कर्नाटकातील सुमारे १०० टन तूर बाजारात आली ही समाधानाची बाब असली तरी यंदाच्या थंडीवर बरेच काही अवलंबून असल्याचे व्यापारी सांगत आहेत. डाळींच्या या किंमत युद्धामध्ये सर्वसाधारण कोलम तांदूळ पाच रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे कांदा, डाळ, यांच्यानंतर सरकारला तांदळाच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्याची कसरत करावी लागणार आहे.
देशात कमी झालेले डाळींचे उत्पादन, परदेशातून वेळीच न मागवलेली डाळ यांमुळे डाळीने २२० रुपये दर घेतला. सरकारने साठेबाजांवर केलेल्या कारवाईमुळे डाळ १८० रुपये किलोपर्यंत खाली आली असली तरी पुढील दोन महिने डाळीच्या या दरात घट होण्याची शक्यता दुरापास्त आहे. सरकारने जप्त केलेली डाळ काही ठिकाणी शंभर रुपयांना विकली जात आहे पण सर्वसाधारपणे ग्राहकाला ही डाळ १८० रुपये किलोनेच किरकोळ बाजारात विकत मिळत आहे. त्यामुळे सर्वाना १०० रुपयांत डाळ हे सरकारचे आश्वासन फोल ठरले आहे. कर्नाटक व सोलापूरमधील तूर अलीकडे मुंबई, पुणे घाऊक बाजारात येऊ लागली आहे पण या तुरीवर प्रक्रिया करण्यासाठी आणखी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागणार असून त्यानंतर ती डाळ बाजारात येणार आहे. प्रक्रिया केल्यानंतर दहा ट्रक तुरीमध्ये दोन ट्रक तूरडाळ तयार होत असल्याचे व्यापारी आयुष मेहता यांनी सांगितले.
डाळीचे देशातील उत्पादन यंदा पडणाऱ्या थंडीवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संक्रांतीनंतर डाळीचे देशातील स्थिती स्पष्ट होणार असून त्यानंतर डाळीचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

डाळीचे किंमतयुद्ध गेले दोन महिने सुरू असताना अचानक सर्वसाधारण तांदळाच्या किमतीतही वाढ झाली आहे. घाऊक बाजारात २० ते ४३ रुपये प्रति किलो असलेला स्थानिक तांदूळ २५ ते ४७ रुपये घाऊक बाजारात विकला गेला आहे. त्यामुळे साहजिक तो किरकोळ बाजारात ४० ते ६० रुपये इतक्या चढय़ा दराने विकला जाणार आहे. अवकाळी पावासाने तांदळाची शेती नेस्तनाबूत केली आहे. त्यामुळे तांदळाचीही दरवाढ होणे संभव असून सरकारला कांदा, डाळीनंतर आता तांदूळ दरवाढ नियंत्रणासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

दहा ट्रक तुर बाजारात आली तरी त्यावर प्रक्रिया केल्यानंतर दोन ट्रक तूरडाळ तयार होते. डाळीचे देशातील उत्पादन यंदा पडणाऱ्या थंडीवरच अवलंबून आहे.
– आयुष मेहता, डाळ व्यापारी.