अद्याप निर्णय न झाल्याचा शाळा व्यवस्थापनाचा दावा

नेरुळमधील डीपीएस (दिल्ली पब्लिक स्कूल) शाळेने केलेल्या शुल्कवाढीविरोधात पालकांनी शुक्रवारी शाळेवर मोर्चा काढला. या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा होता. ‘डीपीएस’ शाळेच्या व्यवस्थापनाने वाढीव शुल्काबाबत पालकांशी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला.

नवी मुंबईतील सर्वात महागडी शाळा अशी ‘डीपीएस’ची ख्याती आहे. या शाळेच्या पूर्व शिशुवर्गात प्रवेश घेण्यासाठी अवाजवी शुल्क आकारले जाते. काही पालकांनी हे शुल्क भरले आहे; शिक्षक आणि पालक संघटनेशी चर्चा न करताच शाळेने एकतर्फी निर्णय घेत ही शुल्कवाढ केल्याचा आरोप पालकांनी या वेळी केला. त्यामुळे वाढीव शुल्क न भरण्याचा निर्णय काही पालकांनी घेतला. शाळा व्यवस्थापनाने शुल्क भरल्याची पावती दिल्याचा दावा केला असला तरी पालकांनी हा दावा फेटाळून लावला आहे. शाळेने शुल्क घेतले, पण त्याची पावती काही पालकांना अद्याप मिळालेली नाही, असे स्पष्ट केले. प्रवेशासाठी पालकांना लाखाच्या घरात रक्कम भरावी लागते. त्यात पुन्हा व्यवस्थापन वर्षांकाठी शुल्कात काही हजारांची वाढ करीत असते. यंदा शाळेने पैशांची पुन्हा मागणी केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला.

या वेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर पालकांचा संताप बघून अखेर शालेय प्रशासनाने मॅनेजमेंटबरोबर चर्चा करून यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले. या वेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या वेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक काशीनाथ पवार, विभागप्रमुख सुमित्र कडू व शाखाप्रमुख समीर बागवान आदी उपस्थित हाते. या वेळी जोपर्यंत शाळा प्रशासन फीवाढ मागे घेणार नाही, तोपर्यंत शिवसेना आंदोलन करीत राहील असा निर्धार व्यक्त केला. या वेळी नेरुळ येथील दिल्ली पब्ल्कि स्कूलचे मुख्याध्यापक मोहंती म्हणाले की, शुल्कवाढीचा निर्णय शाळेच्या व्यवस्थापनाला कळविण्यात येईल, त्यानंतर निर्णय घेण्यात येईल.