स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू, ५९ संशयित; अन्य आजारांच्या रुग्णांतही वाढ

नवी मुंबई शहरात स्वाइन फ्ल्यूचा ताप वाढू लागला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून रुग्णसंख्या वाढली आहे. त्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, अशी माहिती महापालिकेने दिली. आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. नवी मुंबई शहरात एकूण ५९ संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी ३४ जणांना रोगाची लागण झाली आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, टायफॉइड, लेप्टोस्पायरोसिस अशा आजारांच्या रुग्णांतही वाढ झाली आहे.

हा रोग पावसाळ्यात हवेतील विषाणूंमुळे अधिक पसरतो त्यामुळे याला ‘सिझनल फ्ल्यू’ असे संबोधण्यात येत असल्याचे राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्र (एनसीडीसी) या सरकारी संस्थेने सांगितले. यंदा नवी मुंबईसह राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना, ताणतणावाची जीवनशैली असणाऱ्यांना या रोगाची लागण लवकर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या विषाणूंची उत्पत्ती एका आठवडय़ात होते. त्यामुळे ते वेगाने पसरतात, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. गर्दीत जाणे टाळावे, पौष्टिक आहार घ्यावा, खोकताना तोंडावर रुमाल लावा, पुरेशी झोप घ्यावी, हात वारंवार साबणाने धुवावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.

यंदा आजार वाढणार

सिझनल  फ्ल्यूच्या एचवन एनवन विषाणूंमध्ये दर चार वर्षांनी आनुवंशिक सुधारणा होतात. यंदा चौथे वर्ष असल्याने यावेळी हा आजार जास्त फोफावण्याची शक्यता महापालिकेने वर्तवली आहे. नवी मुंबईत जानेवारीपासून ते ३ जुलैपर्यंत एकूण ५९ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी ३४ रुग्णांना या विषाणूची लागण झाली आहे. राज्यात जानेवारी ते १८ जूनपर्यंत १४२८ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. त्यापैकी २४७ दगावले आहेत. नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

उरणमध्ये स्वाइन फ्ल्यूचा रुग्ण

उरण तालुक्यातही स्वाइन फ्ल्यूचा एक रुग्ण आढल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. या रुग्णावर सध्या नवी मुंबईत उपचार सुरू असून स्वाइन फ्ल्यूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी उपाय करण्यात आले आहेत, अशी माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र ईटकर यांनी दिली. लक्षणे आढळल्यास ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्याचे, आवाहन त्यांनी केले आहे.

यंदा स्वाइन फ्ल्यू बाळवण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सर्दी, ताप, खोकला आल्यास त्वरित उपचार घ्यावेत. आजार अंगावर काढू नयेत.   – डॉ. दीपक परोपकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका