पालिका आयुक्त मुंढे यांचा शिस्तीचा बडगा

कार्यालयीन शिस्त आणि नेमून दिलेले कामकाज सुरळीत न करणाऱ्या १४ विभाग अधिकाऱ्यांना नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावल्या. विशेष म्हणजे या सर्व कारवाईचा गोपनीय अहवालात दखल घेतली जाणार आहे. त्याचा अहवाल शुक्रवारी सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला दर सोमवारी होणाऱ्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना कामाचा लेखाजोखा द्यावा लागत आहे.

पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी आयुक्तांनी कामचोर कर्मचाऱ्यांच्या नाडय़ा आवळल्या आहेत. पालिकेत एकूण २३ उच्च अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली विविध नागरी सेवांचा कारभार चालत असून या विभागांकडे दररोज हजारो नागरिकांच्या तक्रारी येत असतात. त्याचा निपटारा सर्वप्रथम करण्याचे आदेश मुंढे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तक्रारी आणि त्यावर झालेली कारवाई, प्रलंबित असल्यास त्याची कारणे, ती तक्रार कोणाकडे वर्ग केली, असे मुद्दे असतील. तक्रारींच्या अहवालात दोन अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व डॉ. संजय पत्तीवार यांनाही यापुढे त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचे काय झाले याचा अहवाल द्यावा लागणार आहे. शहर अभियंता व सहशहर अभियंता यांनी तक्रारी अहवालात जनतेच्या शून्य तक्रारी असल्याचे नमूद केल्याने आयुक्तांनी आश्चर्य व्यक्त केले.

अधिकाऱ्यांना नोटिसा

प्रशासकीय शिस्त व नेमून दिलेल्या कामकाजात प्रगती न झाल्याने १४ अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या असून खुलासा मागविण्यात आला आहे. यात अतिरिक्त आयुक्तांचाही समावेश आहे. दरम्यान पालिकेत उशिरा येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या त्या दिवसाच्या पगाराला कात्री लावण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. या लेटलतिफ कारभारात सोमवारी नगरसचिव चित्रा बाविस्कर सापडल्या. आयुक्तांनी बोलाविलेल्या एका बैठकीला त्यांनी दांडी मारल्याने त्यांच्यावरही सोमवारच्या वेतनावर पाणी सोडण्याची वेळ आली. महापौर सुधाकर सोनावणे यांनी बोलविल्याने त्यांना बैठकीला जाता आले नाही असे त्यांनी सांगितले, पण त्याची कल्पना प्रशासनाला देणे बंधनकारक असल्याचे त्यांना ठणकावण्यात आले. त्यामुळे या कारवाईतून कोणाचीही सुटका नाही असा संदेश एक प्रकारे देण्यात आला.

प्रशासनाच्या सोयीनुसार कामाचे विक्रेंद्रीकरण व्हावे आणि ‘आवक’ वाढावी यासाठी काही माजी आयुक्तांनी विभाग अधिकाऱ्यांची मक्तेदारी निर्माण केली होती. पालिकेचा महत्त्वाचा विभाग असलेल्या अभियंता विभागाचा प्रमुख एकच असावा या उद्देशाने मुंढे यांनी अतिरिक्त व सहशहर अभियंत्यांचा स्वतंत्र कारभार शहर अभियंता मोहन डगांवकर यांच्या देखरेखेखाली दिला आहे. त्यामुळे शहरातील सर्व स्थापत्य व विद्युत कामांची जबाबदारी आता डगांवकर यांची राहणार आहे.