औद्योगिक वसाहतीतील दूषित वायूमुळे झोप उडाली; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार रात्री सोडत असलेल्या दूषित वायूमुळे नावडेवासीयांची झोप उडाली आहे. प्रदूषणाची ही मगरमिठी दूर कशी करावी असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. स्वस्तात घर मिळावे म्हणून २० लाखांमध्ये घर घेतलेल्यांना रोज प्रदूषणाचा छळ सहन करावा लागत आहे.

औद्योगिक वसाहतीच्या परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ व लहानग्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. बुधवारी या वसाहतीमधील अनेकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) बेलापूर येथील कार्यालय गाठले. प्रदूषणामुळे घुसमट होते. खिडक्या-दरवाजे बंद ठेवून राहावे लागते, अशी येथील रहिवाशांची तक्रार आहे. गेल्या वर्षी पर्यावरण विभागाचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी नावडेच्या नागरिकांना वर्षभरात हा परिसरात प्रदूषणमुक्त करू असे आश्वासन दिले होते. मंत्र्यांच्या या घोषणेनंतर प्रदूषण कमी करण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. हवेतील प्रदूषणाचे मोजमाप करणारे यंत्रच एमपीसीबी प्रशासनाकडे नसल्याने दूषित वायूचे हवेतील प्रमाण आणि हा वायू कोणत्या कारखान्यांमधून येतो हे कसे ओळखावे, असा प्रश्न या मंडळातील अधिकाऱ्यांना पडला आहे.

तळोजा औद्योगिक परिसरात ६००हून अधिक कारखाने आहेत. त्यांपैकी रासायनिक प्रक्रिया करणारे कारखाने मोठय़ा प्रमाणात आहेत आणि त्यांतून मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते, मात्र एकाही कारखान्याला अद्याप प्रदूषणाबद्दल दोषी ठरविण्यात आलेले नाही. मात्र एमपीसीबीचे अधिकारी आले की प्रदूषण नाहीसे होते, अशी उपरोधक प्रतिक्रिया नावडेवासीयांनी दिली. प्रदूषण मोजणारे यंत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नाही. त्यामुळे तुर्भे टीटीसीतील खासगी कंपनीकडून ऑनलाइन डिसप्ले ओएसी हे यंत्र घेऊन काम चालवले जात आहे.

सीईटीपीमधील गाळावर प्रक्रिया नाही

एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना तळोजा रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी), सिद्धिविनायक, तेजल केमिकल, महावीर केमिकल, ग्लोबल कंपनीवर संशय असल्याने यातील सीईटीपीवगळता इतर कंपन्यांना रात्री कारखाने बंद ठेवण्याचे आवाहन एमपीसीबीने केले आहे. मागील अनेक महिन्यांत साचलेला टाकाऊ रसायनांचा गाळ सीईटीपीमधून न काढल्यामुळे हा गाळ तत्काळ काढणे आणि सीईटीपी प्रकल्पाभोवती दरुगधी येऊ नये म्हणून सुगंधी द्रवांची फवारणी करण्याची सोय सीईटीपी मंडळाने करावी अशा सूचना एमपीसीबीने सीईटीपीला दिल्या आहेत. हे सर्व पंधरा दिवसांच्या आत करावे असेही सूचनांमध्ये नोंदविण्यात आले आहे. नावेडवासीयांचा त्रास दूर करण्यासाठी बुधवारी रात्री एमपीसीबीचे अधिकारी वसाहतीमध्ये स्वत: परीक्षण करणार आहेत.

आपत्ती व्यवस्थापन आराखडाच नाही

आयात केलेला रासायनिक माल उरण परिसरात मोठय़ा प्रमाणात कंटेनरमधून आणला जातो. मालाची क्षमता लक्षात घेता तेथे प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा बनविला आहे. मात्र तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये मोठी व घातक रसायने आणि वायूंची उलाढाल करणाऱ्या कंपन्या असूनही येथे धोकादायक परिस्थितीत काय करावे, याविषयी जनजागृती करण्यात आलेली नाही. तळोजामधील आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा प्रशासनाने बनवलाच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.