एका महिन्यातील कामगिरी
केगांव दांडा येथील राज संतोष पाटील या दहावर्षीय जलतरणपटूने एक ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आठ समुद्रमार्ग पार करण्याचा विक्रम केला आहे. असा विक्रम करणारा सर्वात लहान जलतरणपटू म्हणून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे. राजने आपले वडील व आंतरराष्ट्रीय जलतरणपटू संतोष पाटील यांच्याकडून प्रेरणा व मार्गदर्शन घेतले.
संतोष पाटील यांनी अनेक अडणींवर मात करीत अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील खाडय़ा पार करून विक्रम केले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा राज हा जलतरण क्षेत्रात नाव कमावण्याच्या उद्देशाने उतरला आहे. या विक्रमाची सुरुवात राजने उरणच्या केगाव ते कानोजी आंग्रे नगर २४ किलोमीटरचे सागरी अंतर पार करून केली. त्यानंतर मोरा बंदर ते गेटवे ऑफ इंडिया हा २४ किलोमीटरचा परतीचा मार्ग, एलिफंटा (घारापुरी) ते मांडवा जेटी- २१ किलोमीटर, रेवस ते भाऊचा धक्का २२ किलोमीटर तसेच मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया १५ किलोमीटर, राज भवन ते गेटवे १५ किलोमीटर, रेवस जेट्टी ते मोरा बंदर २२ किलोमीटर व अखेरीस बेलापूर जेट्टी ते गेटवे असा २५ किलोमीटर सागरी मार्ग त्याने पार केला.
त्याच्या या विक्रमासाठी तो शिकत असलेल्या केंद्रीय विद्यालयाने त्याला दोन महिन्यांची सूट दिली होती. या विक्रमासाठी राज दररोज चार तासांचा सराव करीत होता. सोमवारी मध्यरात्री ३ वाजता त्याने बेलापूर येथील रेतीबंदरहून बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया असे २५ किलोमीटरचे सागरी अंतर कापण्यासाठी सुरुवात केली. या प्रवासाला सहा तास लागतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता, मात्र पाण्याचा प्रवाह बदलल्याने राजला अकरा तास पोहावे लागले. उरणमध्ये परतल्यानंतर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.