नवी मुंबई महानगरपालिका आणि नाझझीन इव्हेंट मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस यांनी इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या सहकार्याने द मराठी तेलुगू महोत्सवाचे आयोजन केले आहे. पालिकेच्या सीवूड्स येथील तांडेल मैदानात ६ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत हा महोत्सव रंगेल. या महोत्सवाच्या उद्घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव तसेच तीनही राज्यांचे राज्यपाल उपस्थित राहाणार आहेत.

या महोत्सवात महाराष्ट्र, आंधप्रदेश आणि तेलंगण राज्यांमधील समान सांस्कृतिक दुवे उलगडून दाखवण्यात येणार आहेत, तसेच महाराष्ट्राच्या ३५, आंधप्रदेशमधील १३ आणि तेलंगणमधील १० जिल्ह्य़ांमधील कलाकारांचे कार्यक्रम हे या महोत्सवाचे आकर्षण असेल.

या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील २४ लाख तेलुगू बांधवांपर्यंत आणि तेलंगण व आंधप्रदेशमधील ६ लाख मराठी बांधवांपर्यंत पोहोचण्याचा मानस असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

या महोत्सवात महाराष्ट्रातील महिलांची मंगळागौर, लेझीम नृत्य, पंढरपूरच्या विठ्ठलभक्तीत न्हाऊन निघालेली दिंडी, शेतकरी नृत्य आणि महाराष्ट्राची लावणी सादर होणार आहे. तसेच तेलुगू आणि मराठी रंगमंचावरील काही गाजलेले नाटयप्रयोगही यावेळी सादर होणार आहेत. तीनही राज्यांतील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकांना सन्मानित करण्यात येणार असून बचत गटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी २० बचत गट कक्ष उभारण्यात येणार आहेत.